आरएसबी रिटेल इंडिया कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी केले दाखल
- ₹500 कोटी नवे भांडवल उभारले जाणार
- ₹118 कोटी नव्या स्टोअर्सच्या उभारणीसाठी राखीव
- 2.98 कोटी इक्विटी शेअर्सचा OFS (ऑफर फॉर सेल)
आरएसबी रिटेल इंडिया लिमिटेड ही प्रीमियम, मिड- प्रीमियम आणि व्हॅल्यू ग्राहक गटांना उद्देशून मल्टी-फॉरमॅट अपॅरल रिटेलर असून, एथनिक वेअर, दैनंदिन कॅज्युअल वेअर आणि फॉर्मल वेअर अशी विविध उत्पादने उपलब्ध करून देते. कंपनीने भांडवल उभारणीसाठी इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) च्या माध्यमातून निधी उभारण्याच्या उद्देशाने कॅपिटल मार्केट नियामक सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे.
डीआरएचपीनुसार, हैदराबादस्थित या कंपनीचा प्रस्तावित आयपीओ हा एकत्रित स्वरूपाचा असून, त्यात ₹500 कोटींच्या इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू, तसेच विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्सकडून 2.98 कोटी इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे.
ओएफएसच्या (Offer for Sale) अंतर्गत विक्री करणाऱ्या शेअरहोल्डर्समध्ये पोटी वेंकटेश्वरलु, सीर्ना राजमौली, तिरुवीधुला प्रसाद राव, पोटी वेंकट साई अभिनय, सीर्ना सुरेश, तिरुवीधुला राकेश, तिरुवीधुला केशव गुप्ता, माटुरु वेंकट लक्ष्मी सिंधू, गौरीशेट्टी ललिता आणि पोटी मालती लक्ष्मी कुमारी यांचा समावेश आहे.
फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ रकमेचा (Net Proceeds) वापर करण्याचा आरएसबी रिटेलचा प्रस्ताव पुढीलप्रमाणे आहे: ₹275 कोटी कंपनीने घेतलेल्या काही कर्ज सुविधांच्या परतफेडी/ आगाऊ परतफेडीसाठी, ₹118 कोटी आर. एस. ब्रदर्स आणि साउथ इंडिया शॉपिंग मॉल या फॉरमॅट्सअंतर्गत नवी स्टोअर्स उभारण्यासाठी व उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी.
आरएसबी रिटेलची स्थापना 2008 मध्ये झाली. तथापि, कंपनीचा प्रवास 1999 पासून सुरू झाला, जेव्हा हैदराबाद (तेलंगणा) येथील कोटी भागात पहिले आर. एस. ब्रदर्स स्टोअर सुरू करण्यात आले.
31 मार्च 2025 पर्यंत आरएसबी रिटेलची एकूण 73 स्टोअर्स 22 शहरांमध्ये कार्यरत होती. ही सर्व स्टोअर्स दक्षिण भारतातील तीन राज्यांमध्ये म्हणजेच तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथे आहेत. कंपनी मुख्यतः साउथ इंडिया शॉपिंग मॉल, आर. एस. ब्रदर्स, कांचीपुरम नारायणी सिल्क्स, डे रॉयल आणि व्हॅल्यू झोन हायपर मार्ट या पाच महत्त्वाच्या ब्रिक-अँड-मॉर्टर स्टोअर फॉरमॅट्समधून कार्य करते.
आर्थिक वर्ष 2025 मध्ये आरएसबी रिटेल इंडिया लिमिटेडने ऑपरेशन्समधून ₹2,694 कोटींचे उत्पन्न नोंदविले. FY23 ते FY25 या कालावधीत कंपनीने 12.55% च्या सीएजीआरने (CAGR) वाढ साधली. आर्थिक वर्ष 2025 मध्ये करानंतरचा नफा ₹104.4 कोटी होता.
कंपनीचे प्रवर्तक (Promoters) म्हणून पोटी वेंकटेश्वरलु, सीर्ना राजमौली, तिरुवीधुला प्रसाद राव, पोटी वेंकट साई अभिनय, सीर्ना सुरेश, तिरुवीधुला राकेश आणि तिरुवीधुला केशव गुप्ता यांचा समावेश आहे.
दक्षिण भारतातील अपॅरल मार्केट हे देशाच्या एकूण अपॅरल मार्केटच्या 28% इतके असून, वित्त वर्ष 2024 मध्ये त्याची किंमत ₹1,723 अब्ज इतकी होती. हा बाजार 12% च्या सीएजीआरने (CAGR) वाढत वित्त वर्ष 2029 पर्यंत ₹3,050 अब्ज इतका होईल, असा अंदाज आहे.
या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून मोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
