Monday, June 15, 2026
BusinessLatest News

एसबीआय लाइफ इन्शुरन्स आणि एयू स्मॉल फायनान्स बँक यांची भागीदारी; भारतभर व्यापक विमा सेवा पोहोचवण्यासाठी पुढाकार

पुणे  : भारतातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह आयुर्विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’ने देशातील सर्वात मोठ्या सूक्ष्मवित्त बँकेपैकी एक असलेल्या ‘एयू स्मॉल फायनान्स’ बँकेसोबत धोरणात्मक कॉर्पोरेट एजन्सी भागीदारी केली आहे. या सहकार्याचा उद्देश म्हणजे देशभरात संपूर्ण आणि विश्वासार्ह विमा योजना पोहोचवणे, विशेषतः दुर्लक्षित आणि नवोदित बाजारांमध्ये आर्थिक संरक्षणासाठी कवच उपलब्ध करणे. यामुळे केंद्र सरकारच्या ‘२०४७पर्यंत सर्वांसाठी विमा’ या महत्त्वाकांक्षी योजनेला चालना मिळणार आहे.

या करारावर एयू स्मॉल फायनान्स बँके’चे बँकइन्शुरन्स व क्रॉस सेल्स प्रमुख दिलीप के. विद्यार्थी आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स’चे मुंबई मेट्रो विभागीय संचालक अश्विनी कुमार यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी एसबीआय लाइफचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि संस्थात्मक भागीदारी प्रमुख गिरीश थम्पी, तसेच दोन्ही संस्थांतील इतर मान्यवरही उपस्थित होते.

या भागीदारीमुळे, एयू स्मॉल फायनान्स बँक आता ‘एसबीआय लाइफ’च्या आयुर्विमा योजनांचा विस्तृत संच आपल्या २,५०५ हून अधिक बँकिंग टचपॉईंट्सच्या मजबूत नेटवर्कद्वारे वितरीत करणार आहे. ‘एसबीआय’च्या विमा योजनांमध्ये संरक्षण, बचत आणि गुंतवणूक योजना, मुलांसाठी योजना, मनी बॅक, निवृत्तीवेतन योजना इत्यादींचा समावेश आहे. ‘एयू स्मॉल फायनान्स बँके’चे नेटवर्क २१ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेले आहे. या एकत्रित प्रणालीमुळे ग्राहकांना बँकिंग आणि विमा या दोन्ही सेवा एकाच ठिकाणी मिळू शकतील आणि त्यांच्या विमाविषयक गरजा, तसेच दीर्घकालीन आर्थिक नियोजन सहज पूर्ण होऊ शकेल.

‘एसबीआय लाइफ’ला देशभरात विमा स्वीकारार्हता वाढवण्याचा आणि विश्वासार्ह विमा सेवा पुरवण्याचा सिद्ध अनुभव आहे. त्यामुळे एयू बँकेसोबतची ही भागीदारी ग्रामीण व निमशहरी भागांत विमा कव्हरेज पोहोचवण्याच्या प्रयत्नांना आणखी बळ देईल. या सहकार्याच्या माध्यमातून ‘एयू बँके’च्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स आणि ग्राहकांशी संवाद साधण्याच्या विविध माध्यमांचा वापर करून विमा प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि सर्वांसाठी सुलभ करण्यात येईल.

एयू स्मॉल फायनान्स बँकेचे कार्यकारी संचालक आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम टिबरेवाल म्हणाले, “एयू स्मॉल फायनान्स बँकेत आम्ही असा विश्वास ठेवतो की आर्थिक सुरक्षितता हा कोणाचा विशेषाधिकार नाही, तर तो प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’सोबतची ही भागीदारी आमचा आणि त्यांचा सामायिक उद्देश अधिक बळकट करते. भारतातील शहरी व निमशहरी भागांतील विविध समुदायांपर्यंत गरजेनुसार विमा सेवा पोहोचवणे हा तो उद्देश आहे. दोन्ही संस्थांची ताकद एकत्र करून, आम्ही खऱ्या अर्थाने आर्थिक समावेशन घडवून आणू आणि कोट्यवधी लोकांचे भविष्य सुरक्षित करू, हा आमचा विश्वास आहे.”

एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे व्यवसाय धोरण विभागाचे अध्यक्ष अभिजित गुळाणीकर म्हणाले, “एयू स्मॉल फायनान्स बँकेसोबतची आमची भागीदारी हे भारतात विमा स्वीकारार्हतेत वाढ घडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. एसबीआय लाइफमध्ये आम्ही लोकांच्या कुटुंबांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या बांधिलकीने काम करतो. एयू बँकेची ग्रामीण भागांतील मजबूत पोहोच आणि समुदायाशी असलेला नातेसंबंध आम्हाला ‘२०४७ पर्यंत सर्वांसाठी विमा’ या सामायिक दृष्टिकोनाच्या आणखी जवळ घेऊन जाईल. तसेच प्रत्येक कुटुंबापर्यंत विम्याचे संरक्षण पोहोचवण्याचे आमचे ध्येय साध्य करण्यासाठी मदतही करेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading