Friday, April 10, 2026
Latest NewsPUNE

दिग्गजांच्या शास्त्रीय, नाट्य. भाव व भक्ती संगीताच्या सादरीकरणाने बहरला १४ वा ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव

 

पुणे  : पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांचे कसदार गायन, विदुषी कलापिनी कोमकली, पं. जयतीर्थ मेवुंडी व पं. शौनक अभिषेकी या त्रयींनी सादर केलेल्या शास्त्रीय, नाट्य, भाव व भक्ती संगीताच्या मनोहरी रचना आणि एस. आकाश व यज्ञेश रायकर या आश्वासक कलाकारांचे वादन यांमुळे यावर्षीचा १४ वा ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव उत्तरोत्तर बहरत गेलेला रसिकांनी अनुभविला.

पुण्यातील सृजन फाऊंडेशन यांच्या वतीने आणि नांदेड सिटीच्या संयुक्त विद्यमाने १४ वा दोन दिवसीय ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सव नुकताच टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे संपन्न झाला. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, आध्यात्मिक गुरु डॉ. सुनील काळे यांच्या हस्ते महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन  करण्यात आले. महोत्सवाचे आयोजक अधिश प्रकाश पायगुडे, सहआयोजक पं. शौनक अभिषेकी, ज्योत्स्ना भोळे यांच्या कन्या वंदना खांडेकर यावेळी उपस्थित होते.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शिष्य असलेले एस. आकाश आणि व्हायोलिनवादक पं. मिलिंद रायकर यांचे शिष्य व सुपुत्र असलेले यज्ञेश रायकर यांच्या बासरी व व्हायोलिन जुगलबंदीने स्वरोत्सवाला सुरुवात झाली. या दोघांनी यावेळी राग मियां मल्हारची बहारदार प्रस्तुती केली. त्यांनी केलेले विलंबित एकताल व द्रुत एकतालातील सादरीकरण उपस्थितांना जणू मोहवून टाकणारे होते. यज्ञेश रायकर यांनी रचलेल्या अतिदृत तीनतालातील गत रचनेने दोघांनीही सादरीकरणाचा समारोप केला. यावेळी पं. रामदास पळसुले यांनी तबला तर सुखद मुंडे यांनी पखवाजवर साथ केली.

पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांच्या कसदार गायनाने स्वरोत्सवाचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला. त्यांनी सादर केलेल्या राग यमन कल्याण, राग सूर मल्हार व राग सोहोनी ने रसिकांच्या मनावर जणू गारुड घातले. पं व्यंकटेश कुमार यांनी राग यमन मध्ये ‘पट तोरे कवन…’ हा बडा ख्याल, ‘हरवा मोरा रे…’ हा छोटा ख्याल, राग सूर मल्हार मध्ये ‘गरजत आये…’ हा बडा ख्याल तर ‘बदरवा बरसन को आये…’ हा छोटा ख्याल गायला. राग सोहोनी मध्ये ‘काहे करत मोसे…’ हा बडा ख्याल आणि तराना सादर करून त्यांनी उपस्थितांना जणू स्तब्ध केले. ‘समझा मन कोई नहीं अपना…’ या भैरवीने त्यांनी समारोप केला. यावेळी भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अर्णव बुवा, कैवल्य पाटील (तानपुरा) यांनी साथसांगत केली. रत्ना दहिवेलकर यांनी पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

यानंतर दुसऱ्या दिवशी विदुषी कलापिनी कोमकली, पं. जयतीर्थ मेवुंडी व पं. शौनक अभिषेकी या तीन कलाकारांच्या घराण्यांचा संगम साधणाऱ्या ‘परंपरा’ या कार्यक्रमाची मेजवानीच जणू रसिकांना अनुभवायला मिळाली. या अंतर्गत पं शौनक अभिषेकी, पं जयतीर्थ मेवुंडी आणि विदुषी कलापिनी कोमकली यांनी शास्त्रीय संगीता सोबतच नाट्य, भाव आणि भक्ती संगीताची अनुभूती उपस्थितांना दिली.

सुरुवातीला पं शौनक अभिषेकी यांनी राग श्री ची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी  पं. रत्नाकर रामनाथ यांची हनुमान चालिसेवर आधारित ‘पवन सुतना महावीर विक्रम…’ ही बंदिश गायली. याबरोबरच आपले गुरू व वडील पं. जितेंद्र अभिषेकी यांचा एक वेगळा तराणा सादर केला. यानंतर विदुषी कलापिनी कोमकली यांनी पं. कुमार गंधर्व यांची गायकी उपस्थितांसमोर उलगडली. त्यांनी राग श्याम कल्याण मध्ये  ‘म्हारा रसिया अलमारा…’, ‘सावन की सांज… ‘ या रचना गायल्या. जयतीर्थ मेवुंडी यांनी यावेळी राग मेघ मल्हार मध्ये ‘गरज घटा घन…’ ही रचना गायली. ‘ऋतू सावन मन भावन साजनी…’ या स्वरचित बंदिशीने त्यांनी समारोप केला.

या एकल सादरीकरणानंतर या सर्वांनी नाट्य संगीतातील काही पदे, भक्ति, भावगीते व गझल सादर केली. पं. शौनक अभिषेकी यांनी १९६७ ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील पं जितेंद्र अभिषेकी यांची कजरी ढंगाची ‘लागी कलेजवा कटार…’ ही ठुमरी व ‘अवघे गर्जे पंढरपूर…’ व ‘अबीर गुलाल…’ हे अभंग गायले. तर विदुषी कलापिनी कोमकली यांनी संत तुकाराम महाराजांनी लिहिलेले पंडित कुमार गंधर्व यांनी गायलेले ‘काम, क्रोध आम्ही वाहिले विठ्ठली…’ व  ‘लक्ष्मी वल्लभा …’ हे अभंग आणि  ‘रंगीली गणगोर…’ हे लोकगीत गायले. या नंतर पं जयतीर्थ मेवुंडी यांनी ‘आजचा दिवस तुझा’ या चित्रपटातील ‘तुझा गंध येता…’ ही गझल व ‘ठुमक ठुमक पग’ हा अभंग गायला. ‘भाग्यदा लक्ष्मी बारम्मा’ आणि ‘सुनता है गुरू ग्यानी…’ही निर्गुणी भजने गाऊन भैरवी ने त्यांनी समारोप केला.

तीनही कलाकारांना प्रशांत पांडव (तबला), मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), विनीत तिकोणकर (पखवाज) आणि माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली. यासोबतच या अभेद अभिषेकी, करण देवगांवकर, राज शहा, सत्यजीत बेडेकर यांनी गायनसाथ केली. मंगला खाडिलकर यांनी दुसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading