सामाजिक दायित्व पूर्ण करताना सर्वसामावेशक दृष्टिकोन हवा
पुणे : सामाजिक दायित्व अर्थात सीएसआरचे काम पुढे नेत असताना यामध्ये सहभागी प्रत्येक घटकाने सर्वसमावेश दृष्टिकोन ठेवण्याची आवश्यकता असून, असे झाल्यास अपेक्षित असणारा विकास शक्य होईल याबरोबरच सर्वांना प्रगती करणेही सहजसाध्य होईल असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले.
सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (सीप) तर्फे बंडगार्डन रस्त्यावरील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे नुकतेच ‘पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आयोजित चर्चासत्रात तज्ज्ञांनी आपली मते मांडली. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाले. सीपच्या अध्यक्षा विनीता गेरा, उपाध्यक्ष शिवराज साबळे, सीपचे सचिव आणि सीपच्या एन्व्हायर्नमेंटल सोशल गव्हर्नन्स म्हणजेच ईएसजी फोरमचे समन्वयक विद्याधर पुरंदरे, खजिनदार आनंद रानडे, तसेच व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य अभिजित अत्रे, नितीन देशपांडे, आशुतोष पारसनीस, अमोद देशपांडे, शिवेश विश्वनाथन तसेच उदय गुजर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कॉर्पोरेट संस्थांचा सीएसआर निधी बऱ्याचदा योग्य सामाजिक संस्थांपर्यंत पोहोचत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेत सीएसआर निधीचा योग्य व परिणामकारक वापर व्हावा यादृष्टीने सीपच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे. योग्य संस्थांना योग्य उपक्रमांसाठी जोडून देण्याच्या उद्देशाने एन्व्हायर्नमेंटल सोशल गव्हर्नन्स म्हणजेच ईएसजी फोरम या व्यासपीठाची निर्मिती सीपतर्फे करण्यात आली असून याचाच एक भाग म्हणून ‘पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग’ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोलताना पर्सिस्टंट फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे म्हणाल्या की, जगभरात भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. देशात सर्वाधिक तरुण आहेत, पण त्या तुलनेमध्ये नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे तरुणांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून संधी शोधून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
यानंतर संपन्न झालेल्या चर्चासत्रात ‘सामाजिक दायित्व’ या विषयावर सचिन गाडगीळ, आर्किटेक्ट अनघा परांजपे, विद्याधर पुरंदरे, जिग्नेश ठक्कर, शिवम सिंग यांनी सहभाग घेत आपली मते मांडली.
सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रात काम करताना त्यामध्ये अनेक प्रकारची आव्हाने आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी कंपन्या आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी मानसिकतेमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आर्किटेक्ट अनघा परांजपे म्हणाल्या, “गेल्या काही दशकात पर्यावरणाचा प्रश्न हा गंभीर बनत चालला असून आता त्याकडे बारकाईने लक्ष देणे निकडीचे झाले आहे. आपण राहतो तो भाग अधिक हरित कसा राहील, याकडे लक्ष देतानाच नागरिकांमध्ये पाण्याची बचत करण्याची सवय अंगवळणी पाडणे गरजेचे आहे. जगातल्या अनेक भागामधील शहरे आता मरत चालली असल्याचे चित्र असताना भारतात मात्र शहरे वाढत आहेत.” नवीन पिढी प्रयोगशील असून त्यांची सखोल विचार करण्याची पद्धत चांगली आहे असल्याचे मतही परांजपे यांनी व्यक्त केले.
सीएसआरच्या माध्यमातून काम करताना या ठिकाणी असणारे प्रश्न सोडवण्यासाठी कंपन्या आणि समाज यांमध्ये दरी आहे. ती कमी करण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन तो प्रश्न कायमचा सोडवण्याची आवश्यकता दिवसेंदिवस अधोरेखित होत आहे. शहराचा विकास होत असताना त्याचा योग्य पद्धतीने विचार होणे महत्त्वपूर्ण आहे. भविष्य काळातील गरजा ओळखून तसे नियोजन करून, लोकांना एकत्र करून त्यांचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडवण्याची आवश्यकता असल्याचे विद्याधर पुरंदरे यावेळी म्हणाले.
समाजाची गरज काय आहे ? ते ओळखून काम करण्याची आवश्यकता याकडे लक्ष वेधत जिग्नेश ठक्कर म्हणाले, “शाश्वत विकास करण्यासाठी कंपन्या आणि समाज यांना एकत्र आणून पुढे जाण्याची गरज आहे. तरुण वर्गाकडे चांगल्या प्रकारची ऊर्जा आहे, त्याचा सकारात्मक उपयोग करून घेतला तर विकास साधणे सहज शक्य होऊ शकते.”
सीएसआरच्या कामामध्ये लोकांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे. या क्षेत्रात काम करताना मनुष्यबळाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आजची तरुण पिढी हुशार आणि क्रियाशील आहे, त्यामुळे त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित केले तर या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ त्यामधून उभे राहू शकते असे गाडगीळ यावेळी म्हणले. शिवम सिंह यांनी चर्चासत्राचे समन्वय करीत सूत्रसंचालन केले.
