‘साॅफ्ट पाॅवर’ म्हणून चित्रपट माध्यमाचा वापर शक्य – दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे प्रतिपादन
पुणे संवाद आणि सेवागुंज फाऊंडेशन आयोजित विशेष संवाद कार्यक्रमात ते ‘द २.५’ फ्रंट वाॅर : इंडियाज सिक्युरिटी चॅलेंजेस अॅंड द रोल ऑफ सिनेमा ‘ या विषयावर बोलत होते. आरोह वेलणकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. शिवाजीनगर येथील मॉडर्न काॅलेज सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. याप्रसंगी पुणे संवादचे मनोज पोचट, अमित वसिष्ठ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अग्निहोत्री यांचे स्वागत करण्यात आले.
अग्निहोत्री यांनी २.५ वार, ही पाश्चात्त्य संज्ञा असून, प्रत्यक्षात आपण ३.७.५ वार लढत असल्याचा उल्लेख केला. आपल्याच देशातले काही देशद्रोही हे आपले पहिले शत्रू आहेत. इस्लाम हा आपला दुसरा शत्रू आहे. साम्यवाद हा तिसरा शत्रू आहे. शिवाय बांग्लादेश हा आपण दुर्लक्षित केलेला पण अतिधोकादायक असा शत्रू आहे. ज्याचा उल्लेख अग्निहोत्री यांनी ३.७.५ असा केला. पाकिस्तान आणि चीन हे आपले पारंपरिक शत्रू आहेत, तर बांग्लादेश हा इमर्जिंग शत्रू’ आहे, असे ते म्हणाले.
‘दुसर्या महायुद्धात जेव्हा अमेरिका उतरली, तेव्हा अमेरिकन सरकारने हाॅलिवुडला एकत्र करून, विशिष्ट विचार प्रभावीपणे मांडणार्या चित्रपटांची निर्मिती करण्याचे आवाहन केले. लोकशाही, स्वातंत्र्याचे महत्त्व, समतेचे मूल्य अशा काही संकल्पना हाॅलिवुडच्या चित्रपटांतून प्रभावीपणे मांडण्यात आल्या, ज्याचा जनमानसावर विलक्षण परिणाम झाला, हा इतिहास आहे. त्यामुळे चित्रपट माध्यम हे साॅफ्ट पाॅवर म्हणून यशस्वी ठरू शकते, हे सिद्ध झाले. मी सुरवातीला मल्टिस्टारर व्यावसायिक मुख्य धारेत असलेले चित्रपट केले. पण चित्रपटांची ही साॅफ्ट पाॅवर लक्षात येताच, मी काश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स, बुद्धा इन ए ट्रफिक जॅम..आणि आता बंगाल फाईल्स..या चित्रपटांकडे वळलो, असे अग्निहोत्री म्हणाले.
बंगाल हे दुसरे काश्मीर
बंगालविषयी चित्रपट करताना मी जो अभ्यास, संशोधन केले. जो प्रवास केला. बंगाली लोकांना भेटलो. कित्येकांशी संवाद साधला. बंगालमध्ये अनेक दिवस वास्तव्य केले. तळागाळापर्यंत पोचलो. तेव्हा बंगाल हे दुसरे काश्मीर होत आहे, असे माझे मत झाले आहे. वेळीच उपाययोजना करण्याची नितांत गरज बंगालमध्ये आहे. काँग्रेसने जाणीवपूर्वक पंजाबला प्राधान्य दिले. पंजाबी हिंदीत व्यवहार करतात, पण बंगाली भाषेपासून आपण लांब राहिलो. शिक्षण, कला, साहित्य, समाजकार्य, राजकारण, अध्यात्म, तत्त्वज्ञान, नेतृत्व या सर्व बाबतींत अत्यंत पुढारलेला, प्रगत असा हा प्रांत माझ्या पुढील चित्रपटाचा विषय आहे, असे त्यांनी सांगितले.
