Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्राच्या विकासासाठी संघटित होऊन कार्य करण्याची गरज – पद्मश्री चैत्राम पवार यांचे मत

 

पुणे : आज आमचे बारीपाडा गाव संघटित झाल्यामुळे अकराशे एकर जंगलाचे संरक्षण व संवर्धन करता आले आहे. यामुळे गावातील दुष्काळ संपला आणि स्थलांतरालाही आळा बसला. स्थानिक संसाधनांचा उपयोग करून सातत्याने कार्य करणे गरजेचे आहे. आमचे कार्य केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी नाही, तर राष्ट्राला स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच सुरू आहे. त्यासाठी सर्वांनी संघटित होऊन काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी केले.

हयूमनिस्ट युनियन ट्रस्टच्यावतीने हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना ‘अक्षय्य हिंदू पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे पुरस्कार वितरण संपन्न झाला. यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन तुषार दामगुडे, शेफाली वैद्य यांसह अमोल शुक्ला, कल्याणी रणसिंग, हर्षल गरुड, सारिका वाघ,केदार दिवेकर, श्रीनिवास निगडे, पल्लवी ढोले, स्वप्नील तळेकर, निलेश धायरकर,रिषभ परदेशी यांनी केले.

यंदाचा मुख्य पुरस्कार पराग दिवेकर गुरुजी यांना हिंदू एकतेच्या कार्याकरिता, वर्षा परचुरे यांना जनजाती कल्याण कार्याकरिता, अविनाश तायडे यांना धर्म जागरण करिता, अश्विन संपतकुमारन यांना गोपालन यासाठी प्रदान करण्यात आला. तर अर्चना तिवारी यांना पत्रकार म्हणून त्यांच्या कुटुंबाने हा पुरस्कार स्विकारला. तसेच वै. शिरीष महाराज मोरे यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार निलेश भिसे,लोकेश कोंढरे यांच्याकडून प्रदान करण्यात आला.

अन्यायाविरुद्ध लढण्याच्या तयारीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, अकरा हजार रुपये रोख आणि राष्ट्रवादी विचारांच्या लेखकांच्या पुस्तकांचा संच असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी सामाजिक कार्य करत असलेले धायरीतील शिववंदना मित्रपरिवार व न्यू आर्या फाऊंडेशन यांना ‘सांगाती ट्रस्ट’ तर्फे डॉ. सुजित निलेगावकर व अमर भालेराव यांनी एक रुग्णवाहिका प्रदान केली.

संदीपसिंह गिल म्हणाले, अशा सामाजिक कार्यक्रमात तरुणांना मोठ्या संख्येने सहभागी करून घेतले पाहिजे. जेणेकरून पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी केले कार्य त्यांच्यासाठी प्रेरणादायी असेल. अशा आदर्श घेवून भविष्यात त्यांना देखील उत्तम कार्याची प्रेरणा मिळेल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती दैठणकर यांनी केले. ऋषिकेश कण्व यांनी प्रास्ताविक केले. स्नेहल कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading