Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

मामाच्या गावात ‘विशेष’ भाचे मंडळींचे जंगी स्वागत

पुणे : वंचित विशेष चिमुकल्यांना मामाच्या गावाची मजा अनुभविता यावी, याकरिता ‘मामाच्या गावची सफर’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट च्यावतीने करण्यात आले आहे. उंट, घोडे यांची रपेट करत आणि बॅन्ड-बाजाच्या गजरात मामाच्या गावी चाॅकलेट आणि फुगे देऊन भाचे मंडळींचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नृत्याचे धडे घेण्यासोबतच आईस्क्रीम खाण्याचा मनसोक्त आनंद देखील चिमुकल्यांनी घेतला.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भविष्य निधी निर्वाह आयुक्त अमित वशिष्ठ, आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, अभिनेता तेजस बर्वे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, डॉ. मिलिंद भोई, अँड हेमंत झंजाड, पराग शिंदे, अमर लांडे, सचिन सासणे, विक्रांत मोहिते, रोहन जाधव आदी उपस्थित होते.

पुण्यातील माहेर, बचपन वल्ड फोरम, संतुलन पाषाण, संस्कार आदी संस्थातील १८५ मुले- मुली सहभागी झाले आहेत. उपक्रमाचे यंदा २६ वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती दृकश्राव्य माध्यमातून देण्यात आली.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौकात भाचे मंडळींचे स्वागत करण्यात आले. यावेळी हिंदी मराठी गीतांच्या तालावर चिमुकले मनसोक्त नाचले. तर उंट आणि घोडयावरुन रपेट मारत चॉकलेट खाण्याचा आनंद देखील लुटला. पुढील दोन दिवस या मुलांसाठी विविध स्पर्धा, सहली, आर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

दृष्टीहिन जोडप्यांचा विवाह सोहळा रविवारी (दि. ४ मे)

मामाच्या गावची सफर या उपक्रमासोबतच दरवर्षी दृष्टीहिन असलेल्या जोडप्यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन देखील केले जाते. रविवार, दिनांक ४ मे रोजी साखरपुडा, हळदी समारंभ आणि त्यानंतर नवरदेवाची वरात दुपारी ४ वाजता व विवाहाचे धार्मिक विधी होणार आहेत. मुख्य विवाह सोहळा सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे.

*फोटो ओळ : शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे उन्हाळी सुट्टीत आयोजित मामाच्या गावची सफर या उपक्रमात मनमुराद आनंद लुटताना चिमुकले. यावेळी उंट, घोडे यांची रपेट करत आणि बॅन्ड-बाजाच्या गजरात मामाच्या गावी चाॅकलेट आणि फुगे देऊन भाचे मंडळींचे जंगी स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading