Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

युरोपमधील उदारमतवाद आणि वेद-उपनिषदांमधील धर्मतत्त्वांमधून ब्राह्मो व प्रार्थना समाजाची स्थापना

पुणे : ब्राह्मो व प्रार्थना समाजाने धार्मिक आणि सामाजिक सुधारणा करताना वेद आणि उपनिषदे यातील भारतीय धर्मतत्त्वांचा स्वीकार केला. त्यांच्यावर ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रभाव होता, परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही. भारतीय पाया हलू न देता त्यांनी धर्माकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला. पाश्चिमात्यांकडून त्यांनी उदारमतवाद आणि बुद्धिप्रामाण्य अशा चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या, असे मत युरोपियन प्रबोधन व फ्रेंच भाषेचे अभ्यासक डॉ. प्रसाद बर्वे यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील पुणे प्रार्थना समाजाच्या हरिमंदिर प्रवेशाला ११६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त चैत्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. या चैत्रोत्सवात बर्वे यांचे ‘युरोप खंडातील प्रबोधन’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग, खजिनदार प्रशांत पाडवे, ज्येष्ठ सदस्य उषाताई शर्मा हे उपस्थित होते.

डॉ. प्रसाद बर्वे म्हणाले, एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला राजा राममोहन रॉय यांच्यापासून भारतीय प्रबोधनाची सुरुवात बंगालमध्ये झाली. त्यानंतर उत्तरार्धात न्यायमूर्ती रानडे प्रभृतींच्या कार्यामुळे पश्चिम भारतात प्रबोधन घडून आले. त्यापूर्वी भारतातील मध्ययुगीन संत परंपरेचे कार्य हे एका मर्यादित अर्थाने प्रबोधन (रेनेसॉन्स) होते. सामान्य माणसाच्या भाषेला महत्त्व देणे हे रेनेसॉन्सचे वैशिष्ट्य होय. तत्त्वज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत लिहिले गेले पाहिजे, जेणेकरून त्यांना ते समजेल. संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ मराठी भाषेत सांगितली. अशा प्रकारे अनेक संतांनी आपले साहित्य सामान्य माणसाच्या भाषेत लिहून त्यांच्यापर्यंत पोहोचवले.

डॉ. दिलीप जोग म्हणाले, हिंदू धर्माला कोणताही एक संस्थापक नाही. इतर सर्व धर्मांना विशिष्ट संस्थापक आहेत. हिंदू धर्मात अनेक विचारधारा आहेत. राजा राममोहन रॉय यांनी कर्मकांड दूर करून शुद्ध धर्माचा स्वीकार केला, ज्याचा पाया वेद-उपनिषदांमध्ये आहे. त्यांनी बुद्धिप्रामाण्यवाद सुद्धा स्वीकारला. हे सर्व युरोपातील रेनेसॉन्सच्या प्रभावामुळे झाले. आजच्या काळात प्रार्थना समाजाचा मार्ग अधिक सुसंगत वाटतो, कारण त्यामध्ये भारतीयत्व आणि बुद्धिप्रामाण्य दोन्ही आहेत. प्रार्थना समाजाचा मार्ग हा आधुनिक युगासाठी योग्य असा सनातन धर्ममार्ग आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading