Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पर्यावरण संरक्षण ही आपली सामुहिक जबाबदारी – डॉ. श्रीनिवास वडगबाळकर

पुणेः-  पर्यावरण संवर्धन, जतन आणि संरक्षण ही आपली सामुहिक जबाबदारी असून ते आपण कर्तव्य भावनेने केले पाहिजे, असे मत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि राम नदीचे अभ्यासक डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांनी व्यक्त केले. 

राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा, तिची स्वच्छता राखण्यासाठी तरुण पिढी प्रेरीत व्हावी सुरू करण्यात आलेल्या  ‘राम नदी पुनरूज्जीवन अभिमान’ ला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्त किर्लोस्कर वसुंधरातर्फे आयोजित पाचव्या ऑनलाईन ‌‘किर्लोस्कर वसुंधरा राम नदी महोत्सव‌ा‘च्या समारोप प्रसंगी आज डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांना ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ, लेखक आणि अभ्यासू विचारवंत डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते पहिला राम नदी सेवक सन्मान प्रदान करण्यात आला, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना डॉ. श्रीनिवास वडगबाळकर बोलत होते. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर फॅसिलिटेटर आनंद चितळे, किर्लोस्कर वसुंधराचे क्युरेटर डॉ. गुरुदास नूलकर आणि  ‘किर्लोस्कर वसुंधरा’चे संयोजक वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित  होते. 

यावेळी बोलताना डॉ. श्रीनिवास वडगबाळकर म्हणाले की, राम नदीच्या आजुबाजूला असलेल्या नैसर्गिक स्त्रोतांचा शोध घेऊन त्याचे जतन आणि संवर्धन होणे आवश्यक आहे. मुळा-मुठा या जमिनीच्या सम पातळीवर असल्याने त्याच्या आजुबाजूला असलेल्या वस्तीमुळे त्याचे जास्त प्रदूषण होते. तुलेनेने राम नदी उंचावर असल्यामुळे मुळा-मुठाच्या तुलनेत रामनदीचे शुध्दीकरण करणे अधिक सोपे आहे. राम नदी शुध्दीकरण प्रकल्प यशस्वीरित्या राबवून देशासमोर एक यशस्वी प्रारूप उभे करणे शक्य आहे. किर्लोस्कर वसुंधराच्या माध्यमातून गेली पाच वर्षे या दिशेने प्रयत्न सुरू असून राम नदी शुध्दीकरणाच्या बाबतीत आशेचे किरण दिसू लागले आहेत. मला मिळालेला हा पुरस्कार मी प्रातिनिधीक स्वरूपात स्वीकारत असून पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार मी नम्रपणे समर्पित करीत आहे.

यावेळी बोलताना डॉ. माधव गाडगीळ म्हणाले की, नदीचे प्रदूषण होते तेव्हा ते केवळ जलप्रदूषण नसते, तर त्यातील वनस्पती, प्राणी यांच्यावर देखील विपरीत परिणाम होत असतात. त्या घटकांच्या होणाऱ्या प्रदूषणाचा अभ्यास होणे आवश्यक आहे. साधारण १९५२ च्या सुमारास मी नळ स्टॉपजवळ रहात असताना मुळा-मुठा नदीमध्ये देखील मी पोहोण्यासाठी जायचो, इतके त्या नदीचे पाणी त्यावेळी निर्मळ होते. पण आता त्या गोष्टीची कल्पना देखील करवत नाही. नद्या शुद्धीकरणाच्या बाबतीत अभियान घोषित करणे पुरेसे नसून प्रश्नाच्या मुळाशी जाऊन काम करण्याची आवश्यकता आहे. प्रदूषण नियंत्रणाच्या प्रयत्नांसाठी शासकीय स्तरावर आवाक करणारे आकडे जाहीर होतात. परंतू, वास्तवात प्रदूषण नियंत्रणाच्या बाबतीत नक्की काय काम होते, याच्या शासकीय निष्पती लेखाजोख्यासह वैयक्तिक लेखजोखा होणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘किर्लोस्कर वसुंधरा’चे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी केले. सूत्रसंचालन अनिल गायकवाड यांनी केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading