आश्वासक कलाकारांनी पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवामध्ये जिंकली प्रेक्षकांची मने
पुणे : नवोदित गायिका रागेश्री वैरागकर यांचे गायन, ईशान घोष यांचे दमदार तबलावादन आणि अनिरुद्ध एैथल यांच्या आश्वासक सादरीकरणाने १९ व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवामध्ये उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव सुरु असून आजच्या तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या ‘युवोन्मेष’ या सत्रामध्ये तीन युवा कलाकारांनी आपली कला सादर केली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पं शौनक अभिषेकी, उज्ज्वल केसकर, पं. सत्यशील देशपांडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

आजच्या दिवशीच्या पहिल्या सत्राची सुरुवात किराणा घराण्याचे गायक पं शंकरराव वैरागकर यांची शिष्या व पुतणी असलेल्या रागेश्री वैरागकर यांच्या सुश्राव्य गायनाने झाली. रागेश्री यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात ललत रागाने केली. त्यामध्ये त्यांनी ‘म्होरे घर आयो…’ ही बंदिश सादर केली. नंतर आपल्या गुरू गायत्री जोशी यांची ‘ओ मोरी नैया पार करो रे…’ आणि ‘जोगिया म्होरे घर आये…’ या बंदिशी त्यांनी गायल्या. रागेश्री यांनी आपल्या सादरीकरणाची सांगता पं. शंकरराव वैरागकर यांनी स्वरबद्ध केलेल्या ‘या रे नाचू प्रेमानंदे…’ या अभंगानी केली. रागेश्री यांना कार्तिक स्वामी (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) आणि ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज) या कलाकारांनी साथसंगत केली.

आजच्या दिवशीचे दुसरे सत्र प्रसिद्ध सतारवादक पं. नयन घोष यांचे सुपुत्र व शिष्य आणि फारुखाबाद घराण्याचे आश्वासक युवा तबलावादक ईशान घोष यांच्या एकल तबलावादनानी गाजले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ईशान म्हणाले, “पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवामध्ये कला सादर करण्याची संधी माझ्यासाठी बहुमोल आहे. त्याबद्दल मी ऋणी आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याबद्दल लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि मला आज त्यांच्या नावाने सुरू असलेल्या महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो.”
ईशान यांनी सुरुवातीला तीन ताल सादर केला. त्यानंतर त्यांनी पं. नयन घोष यांच्या काही चिजा अतिशय सुंदर रित्या पेश केल्या. नंतर त्यांनी उस्ताद अमीर हुसैन खान यांची एक चीज प्रेक्षकांना ऐकवली. तसेच त्यांनी विविध प्रसंग वर्णन करणारे काही अतिशय वेगळ्या रचनांचे सादरीकरण करीत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आपल्या सादरीकरणाच्या शेवटी त्यांनी एक पं. निखिल घोष यांची चीज पेश केली. अथर्व कुलकर्णी यांनी ईशानला लेहऱ्यावर समर्पक साथ केली.
रविवारच्या तिसऱ्या सत्रामध्ये बंगळूरस्थित अनिरुद्ध एैथल यांचे हिंदुस्थानी शैलीतील गायन संपन्न झाले. त्यांना कौशिक केळकर यांनी तबल्यावर तर माधव लिमये यांनी संवादिनीवर साथसंगत केली.
अनिरुद्ध यांनी सुरुवातीला राग देसी सादर केला. त्यामध्ये ‘मोरा सैया…’ ही बंदिश आणि पं. सी. आर व्यास यांची ‘आई री आई तोरे मिलन को..’ ही बंदिश गायली. यानंतर त्यांनी ‘मन हरबा…’ आणि ‘सैय्या परो नाही म्होरे पैया…’ या बंदिशी अतिशय मोहकरित्या सादर केल्या. ‘एकच रे मागणे तुझ्या पायी देवा…’ या अभंगाने अनिरुद्ध यांनी आपल्या सादरीकरणाचा शेवट केला.
