आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आयुष्याला मिळाला आकार; करमरकर भगिनींची भावना
पुणे : आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवर आयुष्याला आकार देत असताना त्यांनी लहानपणापासून लावलेली व्यायामाची गोडी, समाजकार्याची निर्माण केलेली आवड यामुळेच आयुष्यात यशस्वी झाल्याची भावना स्वातंत्रपूर्व काळात वेताचा व दोरीवरचा मल्लखांब याचे प्रात्यक्षिक करणाऱ्या भारतातील पहिल्या सात करमरकर भगिनींनी व्यक्त केली.
हिंदू महिला सभेतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘आमचे नवरंगी कर्तृत्व’ या कार्यक्रमामध्ये या सर्व करमरकर भगिनींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. यावेळी आशा करमरकर (मीना आपटे), सरला करमरकर (सुप्रिया बर्वे), शीला करमरकर (सुनीला देवधर), शिरीष करमरकर (वैशाली भट), रेखा करमरकर (रुक्मिणी साठे), कांचन करमरकर (शिल्पा पटवर्धन), वर्षा करमरकर (सोनिया पटवर्धन) यांच्या प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमाचे नवी पेठेतील एस.एम.जोशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध लेखिका आणि मुलाखतकार माधुरी ताम्हणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा सुप्रिया दामले आणि उपाध्यक्षा मधुरा जोगळेकर यांनी त्यांचा सत्कार केला.
आमचे वडील आप्पा म्हणजे मिरजेतील प्रसिद्ध वैद्य म. द. करमरकर यांनी आमच्यामध्ये लहानपणापासूनच खेळाची गोडी निर्माण केली, त्यामुळे आयुष्याला आकार येत गेला. आप्पा हे उत्कृष्ट क्रीडा प्रशिक्षक आणि प्रचारक होते, त्यामुळे त्यांच्या शिस्तीपुढे आमचे काहीच चालायचे नाही. पहाटे पाच वाजता आमचा दिवस सुरु व्हायचा, असे सांगत या भगिनींनी आपल्या कारकिर्दीचा पट उलगडला.
आम्ही खेळाडू म्हणून घडत असताना आई प्रभावती ही देखील दररोज न चुकता पळायला येत असे इतकेच नाही तर ती चांगली खेळाडू होती, कबड्डी, खोखो असे खेळ ती खेळायची. त्यामुळे आमच्यामध्ये ते गुण रुजत गेले. व्यायाम करणे हे इतके अंगवळणी पडले होते की कधी जर केला नाही तर कंटाळा यायचा, अशी आठवण आशा करमरकर यांनी सांगितली. आई आणि वडील यांचे सहजीवन हे डोळा आणि काळजासारखे होते. आम्हा नऊ मुलींना त्यांनी मुलासारखेच वागवल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आप्पांनी या खेळाचा प्रचार आणि प्रसार करताना आम्हाला चांगले माणूस म्हणून घडवण्याचे काम केले. त्यांच्यामुळे आम्ही चांगले खेळाडू म्हणून पुढे आलो. समाजाचे ऋण फेडण्यासाठी लोकांना कायम उपयोगी पडण्याचा गुण त्यांनीच आम्हाला दिला. त्यामुळेच त्यांचा समाजकार्याचा वारसा आम्ही भगिनी पुढे नेत आहेत.
न बोलता काम करा, काम करताना अडचण आली तर त्यावर मात करून पुढे चला, चिकाटी आणि कष्ट याच्या जोरावर यश मिळवा. हे गुण आप्पांनी आपल्यामध्ये रुजवल्यामुळे आज यशस्वी असल्याचे या भगिनींनी यावेळी स्पष्ट केले.
एकेकाळी खेळाडू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या भगिनी व्यवसायात देखील कार्यरत आहेत. मीना आपटे या आपटे फूडस् च्या संस्थापिका असून सुप्रिया बर्वे या हर्बेल उत्पादनामध्ये काम करतात. वैशाली भट या हॉटेल व्यवसायात असून शिल्पा पटवर्धन या रत्नागिरीमधील माजी नगरसेविका आहेत. सोनिया पटवर्धन या हेल्थ क्लबच्या संचालिका आहेत. आयुष्यात पुढे जात असताना आई-वडिलांनी केलेल्या संस्काराचा कायमच फायदा होत आल्यामुळे यश मिळाल्याचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. यावेळी त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गर्दी केली होती. वंदना जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले
