सुमधुर गायन आणि बहारदार व्हायोलिनवादनाने रंगले ‘युवोन्मेष’चे सत्र
आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव सुरु असून आजचे सकाळचे ‘युवोन्मेष’ हे सत्र युवा कलाकारांच्या सादरीकरणाने विशेष ठरले. पं शौनक अभिषेकी, उज्ज्वल केसकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
युवोन्मेष या सत्राची सुरुवात गायक अमोल निसळ यांचे शिष्य असलेल्या करण देवगांवकर यांच्या गायनाने झाली. यावेळी त्यांनी राग ललत सादर केला. यामध्ये त्यांनी ‘रैन का सपना…’,
‘जोगीया मेरे घर आये…’ आणि ‘जा जा जा रे बलमवा…’ या बंदिश गायल्या. ‘ध्यान करू जाता मन हरपले…’ हा अभंग सादर करीत त्यांनी समारोप केला. करण यांना गीत इनामदार (तबला), सुनाद कोरगांवकर (संवादिनी) तर ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज) यांनी साथसंगत केली.

यानंतर प्रसिद्ध व्हायोलिनवादक गुरु पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे शिष्य अमन वरखेडकर यांचे व्हायोलिन वादन संपन्न झाले. यावेळी व्हायोलिन वादक तेजस उपाध्ये यांची विशेष उपस्थिती होती. अमन वरखेडकर यांनी अनेक चित्रपटांसाठी संगीत संयोजन केले असून यावेळी त्यांनी राग किरवाणीची बहारदार प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी आलाप, जोड, झाला, झपताल सादर केला. पहाडी धून सादर करीत त्यांनी समारोप केला. अमन यांना ताराशिष बक्षी यांनी तबल्यावर समर्पक साथसंगत केली.
युवोन्मेषच्या पहिल्या सत्राचा समारोप प्रसिद्ध कीर्तनकार नारायण शास्त्री गोडबोले यांची नात आणि पं केदार बोडस यांची शिष्या श्रुती विश्वकर्मा मराठे यांच्या गायनाने झाली. यावेळी त्यांनी राग शुद्ध सारंगची प्रस्तुती केली. यामध्ये त्यांनी विलंबित तीन ताल प्रस्तुत केला. यानंतर त्यांनी ‘दीन दीन आनंद करत नित…’ ही अंतू बुवांची बंदिश सादर केली. श्रुती यांना प्रणव गुरव यांनी तबला, तर अमेय बिच्चु यांनी संवादिनीवर साथसंगत केली.
