Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

पं. राजेंद्र गंगाणी यांच्या कथक नृत्य प्रस्तुतीने रंगला पं जितेंद्र अभिषेकी महोत्सवाचा दुसरा दिवस

 

पुणे : जयपूर घराण्याचे अग्रणी कथक नर्तक पं. राजेंद्र गंगाणी यांच्या नृत्य प्रस्तुतीने आजच्या १९ व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या सत्राला सुरुवात झाली. पं. राजेंद्र गंगाणी यांनी नावीन्यपूर्ण रचनांसह आपली नृत्याच्या तांत्रिक अंगावर असलेली पकड आज पुन्हा एकदा दाखवून देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सुरू असून आज पं. राजेंद्र गंगाणी, इंद्राणी मुखर्जी आणि पं मधुप मुदगल यांच्या सादरीकरणाने महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे तिसरे सत्र संपन्न झाले. प्रसिद्ध गायक पं. शौनक अभिषेकी, आपला परिसरचे उज्ज्वल केसकर, दादा तरंगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रतिथयश तबलावादक पं सुभाष कामत यांचा उत्कृष्ट संगतकार पुरस्काराने सन्मान करण्यात आला. जसे आपण आई वडिलांचे ऋण कधी फेडू शकत नाही तसेच ऋण माझ्यावर अभिषेकी बुवा, विद्याताई आणि पं शौनक अभिषेकी यांचे आहेत. त्यांची माया, त्यांचे ऋण यातच मी राहू इच्छितो अशा भावना यावेळी पं सुभाष कामत यांनी व्यक्त केल्या.

पं राजेंद्र गंगाणी यांनी शिवस्तुती सादर करीत आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. आपल्या मोठ्यांची आणि गुरूंची आठवण करणे गरजेचे असून त्यांनी दिलेले ज्ञान आणि दीक्षा आपली प्रेरणा असावी, असे सांगत गंगाणी यांनी तीनताल, तरण, तिहाई, झपताल व तीनताल, गणेश परण, आजोबांची बंदिश, छंद यांचे बहारदार नृत्य सादरीकरण केले. आपल्या गुरुंचे गुरू म्हणजेच दादा गुरुजी यांची ‘मन रोकत बनवारी… ‘ ही ठुमरी देखील त्यांनी सादर केली. तबला आणि नृत्याची जुगलबंदी प्रस्तुत करीत त्यांनी समारोप केला.

आम्ही स्वरांचे बोल नृत्याच्या माध्यमातून उभे राहून गातो असे सांगत ते पुढे म्हणाले, “आजकाल नव्या पिढीचे कलाकार वाचिक अभिनयावर भर देतात. नृत्यात नजाकत असावी नाटकीपणा नसा असे मला वाटते. प्रेक्षक स्वर सोडत नाहीत आणि गोंधळ ऐकू शकत नाहीत हे कलाकाराने कायम लक्षात ठेवायला हवे.”

यावेळी सुरंजन खंडाळकर (गायन), पं. अरविंद कुमार आझाद (तबला), अमेय बिच्चु (संवादिनी), सुनील अवचट (बासरी), नीरज व प्रियांका यांनी (पढंत) अशी साथसंगत केली.

यानंतर ठुमरी गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या गायिका इंद्राणी मुखर्जी यांनी आपली गायन प्रस्तुती केली. या व्यासपीठावर गाण्याची अनेक वर्षांची इच्छा होती त्यामुळे आजची संधी हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे असे सांगत त्यांनी राग यमनने आपल्या सादरीकरणाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी आपले गुरू अरुण भादुरी यांची, विलंबित बंदिश, गुरू मंजु सुंदरम यांची तीन तालातील रचना आणि आजोबांची द्रुत एकताल मधील बंदिश गायली. पंडित रामाश्रय यांची होरी ठुमरी सादर करीत त्यांनी समारोप केला. मुखर्जी यांना पं रामदास पळसुले (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), रविराज काळे, मिहिका जोशी (तानपुरा व स्वरसाथ) यांनी साथ संगत केली.

यानंतर कुमार गंधर्व यांचे शिष्य आणि खयाल व भजन गायनासाठी प्रसिद्ध असलेले पद्मश्री पंडित मधुसूदन मुदगल यांच्या गायनाने पंडित जितेंद्र अभिषेकी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा समारोप झाला. त्यांनी यावेळी राग जयजयवंती आणि राग मालकंस सादर करीत उपस्थित प्रेक्षकांना आपल्या गुरुंची आठवण करून दिली. भैरवी सादर करीत त्यांनी समारोप केला. पं. मुदगल यांना भरत कामत (तबला), अरविंद थत्ते (संवादिनी), करण देगांवकर आणि श्री शर्मा (तानपुरा) यांनी साथसंगत केली. रविंद्र खरे यांनी संपूर्ण सत्राचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading