गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडविण्यावर भर देणार – सहकार आयुक्त दीपक तावरे
पुणे : सहकारी संस्था म्हणजे अनेकांना केवळ मोठमोठे साखर कारखाने आणि बँका आठवतात, परंतु सहकारी गृहनिर्माण संस्थांचेही महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर जाळे आहे सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी राज्यातील गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवण्यावर भर देणार असल्याचे मत राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्यावतीने महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांना मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी पुण्यात महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, मुंबई गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, शामला देसाई, सचिव मनिषा कोष्टी, जिल्हा उपनिबंधक संजय राऊत, नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक आशिष त्रिवेदी, कार्यकारी संचालक कर्नल प्रमोद दाहीतुले, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, किरण सोनवणे, आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
दीपक तावरे म्हणाले, संपूर्ण देशामध्ये चार लाखाहून अधिक सहकारी संस्था आहेत. त्यापैकी सुमारे अडीच लाख संस्था या केवळ महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र ही सहकारी संस्थांची गंगोत्री आहे, या ठिकाणी सहकारी संस्था वाढल्या आणि त्याचा फायदा महाराष्ट्राच्या विकासामध्ये झाला. सहकारी पतसंस्था बँका आणि साखर कारखान्यांबरोबरच गृहनिर्माण संस्थांचेही महाराष्ट्रामध्ये मोठे जाळे आहे त्यांचा कारभार अधिक सुलभ करण्यासाठी येत्या काळामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्न सोडवण्यावर भर देणार आहे.
आशिष त्रिवेदी म्हणाले, महाराष्ट्र मध्ये शहरीकरण जसे वाढत आहे, तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यांचे प्रश्न अधिक व्यापक बनत आहेत. या संस्थांच्या कारभारामध्ये एक वाक्यता यावी, यासाठी योग्य प्रशिक्षण शिबिरे राज्यभरात राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रीय आणि राज्यस्तरावर विविध प्रशिक्षण अभ्यासक्रमांची मांडणी करण्यात आली आहे.
शामला देसाई म्हणाल्या, राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या कामांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था ही गेल्या ५० वर्षांपासून काम करत आहे. या संस्थेची आजही महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर गरज आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये महिलांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला असून त्यासाठी पोलीस कमिट्या स्थापन करणे गरजेचे असून त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे.
प्रकाश दरेकर म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सहकार क्षेत्र बळकट केले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्र ही सहकारी संस्थांची पंढरी आणि काशी आहे. या सहकारी संस्थांचा महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठा हातभार लाभलेला आहे. हेच मॉडेल देशभर राबवून सहकारी संस्थांचे जाळे अधिक बळकट केले, तर त्याचा निश्चितच देशाला फायदा होणार आहे.
सुहास पटवर्धन म्हणाले, सहकारी संस्थांचे पुर्ननिर्माण आणि स्वपुर्ननिर्माण या संदर्भात आजही अनेक अडचणी येत आहेत, या संदर्भातील कायदे केवळ कागदावर राहून चालणार नाहीत. सध्या गतिमान सरकार आलेले आहे. तर या कामालाही निश्चितच गती मिळेल. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पुनर्निर्माण आणि स्व पुर्ननिर्माण या संदर्भात नियम सुरळीत केले तर त्याचा निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना फायदा होऊ शकेल.
सहकार मंत्रालय केंद्र आणि राज्य, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था महासंघ, पतसंस्था, बँका महासंघ, म्हाडा सिडको, रोटरी,लायन्स, एनएससीसी, अटल, पुणे पत्रकार संघ, क्रेडाई मेट्रो, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळे, हास्य क्लब विविध शैक्षणिक संस्था, विद्यार्थी आणि इतर समविचारी संघटनांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी पुर्नविकसन, स्वयं-पुर्नविकसन, घनकचरा, ओलासुका कचरा व्यवस्थापन, ई-चार्जिंग सुविधा, अपारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा सोसायट्यांच्या खरेदी खत, मानीव हस्तांतरण, निवडणुका, तंटामुक्त सोसायटी, टँकर मुक्त संस्था,सहकार मित्र, सहकार संवाद आॅनलाईन पोर्टल,बिगर शेती कर, सायबर क्राईम, सीसीटिव्ही, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, सदनिका खरेदी, विक्री, भाड्याने देणे, संस्थांमधील पाळीव प्राणी,सहकारातील असहकार, उदासीनता इत्यादि विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
