Saturday, May 30, 2026
Latest NewsMAHARASHTRA

फेरीवाल्यांवर कारवाई दिखाऊपणाची, पालिका, फेरीवाल्यांचे संगनमत?

मुंबई – मुंबईतील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यास सुरवात झाली असून रेल्वे स्थानकांलगतचे परिसर मोकळे करण्यावर भर दिला जात आहे. मुलुंड पूर्व-पश्चिम, भांडुप पश्चिम या स्टेशनलगत परिसरात दिखाऊपणाची कारवाई केली जात असून पालिका अधिका-यांबरोबर फेरीवाल्यांचे संगनमत असल्याने कारवाई अगोदरच फेरीवाले पसार होतात. कारवाई ही केवळ पालिकेचा दिखाऊपणा असून कारवाई झालीच तर दुस-या दिवशी फेरीवाले आहे त्या जागेवर पुन्हा दिसून येतात. अनेकदा वर्दळ नसताना कारवाई केली जाते मात्र वर्दळीच्या वेळी पालिका अधिका-यांचा पत्ता नसतो. त्यामुळे अशी दिखाऊपणाची कारवाई का केली जाते असा आरोप स्थानिक नागरीक करीत असून पालिका अधिकारी व फेरीवाल्याचे संगनमत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुंबई शहर हे दिवसेंदिवस बकाल होत चालले असून सर्व ठिकाणी दिसणारे अनधिकृत बॅनर, प्लास्टीक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर, फेरीवाल्यांकडून पदपथावर होणारे अतिक्रमण या सारख्या गोष्टींवर मुळापासून कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. गेल्या काही महिन्यांपासून कमी मायक्रॉन असलेल्या पिशव्यांच्या वापरास बंदी घालण्यात आली होती. त्यासाठी अनेक फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. ज्या ठिकाणी पिशव्या तयार होतात. त्या कारखान्यांवर मात्र कारवाई करण्यात आली नसल्याचे नागरिक सांगतात. उच्च न्यायालयाने अनधिकृत बॅनरवर कारवाई करण्याबाबत सुचना केल्या होत्या. मात्र त्यावरही ठोस निर्णय पालिकेने घेतला नाही. दुसरीकडे पदपथावर चालण्याचा नागरिकांचा अधिकार असून तो त्यांना मिळाला पाहिजे असा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने देऊनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मुंबईतील पदपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले असून जाब विचारणा-यांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत.

पालिकेच्या कारवाई पासून वाचण्यासाठी फेरीवाल्यांनी एक व्हॉट्स अँप ग्रुप तयार केला असून कोणत्या भागात पालिकेचे भराची पथक कारवाई करीत आहे. याची थेट माहिती या ग्रुपवर टाकली जाते. शिवाय फेरीवाल्याचा एक म्होरक्या पालिका अधिका-यांच्या संपर्कात असल्याने कधी आणि कोणत्या वेळी कारवाई होणार याची माहिती फेरीवाल्यांना दिली जाते. इतर वार्ड मधून भरारी पथक कारवाई करण्यासाठी कधी येणार याची सुचना देखील फेरीवाल्यांना अगोदरच मिळते. त्यामुळे कारवाईच्या दिवशी फेरीवाले आपले धंदे बंद ठेवतात. असे आरोप स्थानिक नागरीकांनी केले असून कारवाई ही नियमित असायला हवी. भांडुप पश्चिम व मुलुंड पुर्व-पश्चिम या ठिकाणी पदपथ अडविणा-या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत असून या ठिकाणी उघडपणे प्लास्टिक पिशव्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे पालिका अधिकारी केवळ दिखाऊपणाची कारवाई करतात का, शिवाय ही कारवाई कोणासाठी केली जाते असा प्रश्नही नागरीकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading