Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये कानातील जटील स्वरूपाच्या एव्हीएमवर क्रांतिकारी रेडिओसर्जरी तंत्राद्वारे यशस्वीरित्या उपचार

पुणे  : उजव्या कानातील रक्तवाहिन्यांमध्ये क्वचित आढळणारा आणि आव्हानात्मक स्वरूपाचा आजार झालेल्या पुण्यातील एका 30 वर्षीय, रुग्णावर हडपसरच्या सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये चाकोरीबाह्य उपचार करण्यात आले. या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये वर्षभराहून अधिक काळात अनेक प्रकारचे हस्तक्षेप करावे लागले, अखेरीस सह्याद्रि हॉस्पिटल्समधील प्रमुख रेडिएशन आँकोलॉजिस्ट डॉ. संजय एम.एच. यांच्या नेतृत्वाखाली प्रगत उपचार करण्यात आले. या नवोन्मेष्कारी पद्धतीमध्ये प्रगत स्वरूपाच्या एम्बोलायझेशनला (काही रक्तवाहिन्या कृत्रिमरित्या बंद करण्याची प्रक्रिया) अत्याधुनिक स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरीची जोड देण्यात आली. ही उपचारपद्धती खास अशा जटील विकारांसाठी विकसित करण्यात आली आहे.

एप्रिल २०२२ मध्ये हा रुग्ण तपासणीसाठी आला. तेव्हा त्याला उजव्या कानाला सूज, लालसर आणि अधूनमधून रक्तस्राव अशी लक्षणे जाणवत होती. सुरुवातीला केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये आर्टेरिव्हेनस मालफॉर्मेशनचे (एव्हीएम) निदान झाले. यामध्ये रक्तवाहिन्या विचित्र पद्धतीने जोडलेल्या असतात आणि त्यामुळे सामान्य रक्ताभिसरणात अडथळे येत असतात. या अवस्थेवर उपचार झाले नाहीत, तर त्यातून गंभीर स्वरूपाची गुंतागूंत निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, रक्तस्राव किंवा या विचित्र जोडण्यांमार्फत होणाऱ्या रक्ताच्या पम्पिंगचा ताण येऊन हृदयाच्या कामात बिघाड होणे.

रुग्णाच्या एव्हीएमचे व्यवस्थापन करण्यासाठी एप्रिल २०२२ मध्ये एम्बोलायझेशनची प्रक्रिया प्रथम करण्यात आली. यात रक्तवाहिन्यांमार्फत एक घटकपदार्थ सोडला जातो आणि त्याद्वारे विचित्र जोडण्या बंद केल्या जातात, त्यामुळे रक्तस्रावाचा धोका तसेच अन्य लक्षणेही कमी होतात. एम्बोलायझेशननंतर थोडी सुधारणा दिसून आली, तरीही एव्हीएमवर फारसा परिणाम झाला नाही आणि डिसेंबर २०२२ मध्ये लक्षणे पुन्हा दिसून लागली. एव्हीएम वाढल्याचे पुढील तपासणीत दिसून आले. त्यामुळे पुन्हा एकदा एम्बोलायझेशन करून त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय वैद्यकीय पथकाने घेतला. २९ डिसेंबर, २०२२ रोजी त्रासदायक पेशी काढून टाकून संबंधित भागाची नव्याने रचना करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. एम्बोलायझेशन आणि शस्त्रक्रिया अशा दुहेरी उपचारांमुळे रुग्णाच्या स्थितीत सुधारणा झाली, एव्हीएमचे प्रमाण ६०-७० टक्क्यांनी कमी झाले.

मात्र, मार्च २०२३ मध्ये रुग्णाला पुन्हा एकदा सौम्य स्वरूपात लक्षणे जाणवू लागली आणि जुलैपर्यंतच्या काळात एकदा मोठा रक्तस्राव झाला. कान काढून टाकण्यासारखा (अॅम्प्युटेशन) टोकाचा उपाय टाळण्याकडे रुग्णाचा कल असल्यामुळे डॉ. संजय यांना एका नवोन्मेष्कारी उपचार पद्धतीचा विचार करावा लागला. ही उपचार पद्धती म्हणजे स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी. या अत्यंत नेमक्या रेडिओथेरपी तंत्रामध्ये एकाग्र रेडिएशन किरणांद्वारे एव्हीएमला लक्ष्य केले जाते आणि आजुबाजूच्या निरोगी पेशी या किरणांच्या संपर्कात कमीत-कमी येतील याची काळजी घेतली जाते. या विशिष्ट केससाठी एलेक्टा सिनर्जी प्रणालीचा उपयोग करण्यात आला. हे उपकरण अत्यंत नेमकेपणाने रेडिएशन करण्याच्या क्षमतेसाठीच ओळखले जाते. या उपचारामध्ये एकूण २१ जी,वाय. (21 GY) चा रेडिएशन डोस तीन सत्रांमध्ये विभाजित करून, ८ ते १० ऑगस्ट २०२३ दरम्यान देण्यात आला. या उपचारपद्धतीमुळे कानाचे कार्य आणि बाह्यस्वरूप नियमित राखण्यात मदत झाली आणि अधिक इन्वेजिव स्वरूपाच्या शस्त्रक्रियेची गरज भासली नाही.

डॉ. संजय एम.एच. स्पष्ट करतात, “स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरीचा पर्याय निवडल्यामुळे आम्हाला कान काढून टाकणे टाळण्याच्या रुग्णाच्या इच्छेचा मान ठेवून उर्वरित एव्हीएमवर प्रभावीरित्या उपचार करणे शक्य झाले. हे उपचार थेट AVMवर लक्ष केंद्रित करतात आणि असामान्य रक्तवाहिन्यांच्या आतल्या पेशींना नष्ट करण्यासाठी रेडिएशनचा वापर करतात, ज्यामुळे त्यांचे विघटन होते. AVMला उपचारांना प्रतिसाद देण्यास वेळ लागतो, म्हणून आम्ही दीर्घकाळ रुग्णाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून उपचार योग्य प्रकारे काम करत असल्याची खात्री केली. नेमक्या भागाला लक्ष्य करण्यासाठी एलेक्टा सिनर्जी प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरली. त्यामुळे आजुबाजूच्या पेशींचे काहीच नुकसान झाले नाही आणि रुग्णाच्या आयुष्याचा दर्जाही राखला गेला.”

उपचार पूर्ण झाल्यानंतर घ्यावयाच्या काळजीबद्दल डॉ. संजय यांनी सांगितले, “उपचार पूर्ण झाल्यानंतर तात्कालिक साइड-इफेक्ट्सच्या व्यवस्थापनासाठी रुग्णाला बारीक देखरेखीखाली ठेवण्यात आले. त्वचेची जळजळ वगैरे लक्षणे दूर करण्यासाठी योग्य औषधे दिली गेली. या उपचारपद्धतीची दीर्घकालीन परिणामकारकता बघण्यासाठी तसेच संभाव्य गुंतागुंतींवर लक्ष ठेवण्यासाठी

रुग्णाला नियमितपणे तपासणीसाठी बोलावण्यात आले. आत्तापर्यंत रुग्णाने लक्षणीय सुधारणा दाखवली आहे. लक्षणे कमी झाली आहेत आणि कोणतीही मोठी गुंतागूंत निर्माण झालेली नाही.”

अशा प्रकारे प्रथम केले जाणारे उपचार महत्त्वाचे असतात. बाह्यकर्णामधील एव्हीएमवर उपचार करण्यासाठी प्रथमच स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरीचा वापर या रुग्णावर करण्यात आला, यातून सह्याद्रि हॉस्पिटल्सचा वैद्यकीय उपचारांकडे बघण्याचा नवोन्मेष्कारी दृष्टिकोन अधोरेखित होतो. या रुग्णाच्या विकाराचे व्यवस्थापन यशस्वीरित्या झाल्यामुळे शरीरातील पोहोचण्यास कठीण किंवा अधिक संवेदनशील भागांमधील अशाच प्रकारच्या रक्तवाहिन्यांशी निगडित अपसामान्यतांवर उपचार करण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading