रेल्वे समस्यांबाबत खा. संजय दिना पाटील यांनी घेतली विभागीय व्यवस्थापकांची भेट
विद्याविहार येथील घरे एक महिना तोडण्यात येणार नाही. खासदारांना दिले आश्वासन
मुंबई – रेल्वे स्थानकांवर एक्सीलेटर नाहीत, शौचालय आहेत तर त्यांचे दरवाजे नाहीत, शौचालयात स्वच्छता नाही, प्लॅटफॉर्मवर असलेल्या छताला पत्रे नाहीत, पंखे नाहीत, नुतनीकरणामुळे प्लॅटफॉर्मवर चालायला जागा नाही. प्रवाशांना नाहक या गोष्टीचा त्रास होतोय, ही बाब लक्षात घेऊन ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या समस्या मांडल्या. तसेच विद्याविहार येथील रेल्वेच्या जागेवर असलेल्या घरांना किमान एक महिना तोडण्यात येणार नाही असे आश्वासनही खा. संजय दिना पाटील यांना यावेळी देण्यात आले.
मुलुंड, भांडुप, कांजुरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, विद्याविहार व गोवंडी या रेल्वे स्थानकांवर नुतनीकरणाचे काम चालू आहे. कामाची गती पाहता २०३० पर्यत हे काम पुर्ण होणार नाही अशी परिस्थिती आहे. तर मुलुंड भांडुप रेल्वे स्थानकांवरील रेल्वे पुलांवर लावण्यात आलेल्या लाद्या गुळगुळीत असल्याने चालताना पाय घसरुन प्रवाशांना मार लागु शकतो. तसेच अनेक रेल्वे स्थानकांवर पंखे, पत्रे नाहीत. शौचालयांची दुरावस्था आहे. याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना यांची भेट घेऊन खा. संजय दिना पाटील यांनी त्यांच्यासमोर या समस्या मांडल्या. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
विद्याविहार पूर्वेला असलेल्या शास्रीनगर, जवाहर नगर, शिवकृपा सोसायटी, मोहन नगर, बंजारा बस्ती या ठिकाणी राहणा-या ३५० कुटूंबियांना घरे खाली करण्याबाबत रेल्वे विभागाने सांगितले आहे. अचानक अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याने स्थानिक नागरिकांनी खासदार संजय दिना पाटील यांनी भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगितली. खा. संजय पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक मीना यांना याबाबतही सांगितले. या रहिवाश्यांचे अगोदर पुनर्वसन करा. त्यानंतरच घरे तोडण्यासंदर्भात कारवाई करण्यात यावी. असे सुचित केले. सध्या मुलांच्या परिक्षा चालू असल्याने त्यांना काही मुदत देण्यात यावी, अशी विनंती मीना यांना यावेळी केली. त्यावर किमान एक महिना कारवाई करण्यात येणार नाही. असे आश्वासनही मीना यांनी खा. संजय पाटील यांना दिले.
