‘संगीताच्या जागरुकतेसाठी म्यूझिक सर्कल वाढावीत’ – आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांची अपेक्षा
‘खयाल’ अंतर्गत रंगली शुभारंभाची सुरेल मैफल
पुणे : “अभिजात संगीताच्या क्षेत्रात महाराष्ट्र हे जागरुक राज्य आहे, कारण इथे म्यूझिक सर्कल ही संकल्पना रुजली आहे. देशात इतरत्र फारशी म्यूझिक सर्कल आढळत नाहीत. कलाकार कलेच्या माध्यमातून जे सांगतो, ते ऐकण्याची संधी म्यूझिक सर्कल देतात. त्यामुळे सर्वत्र म्यूझिक सर्कल वाढावीत”, अशी अपेक्षा आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली.
निमित्त होते श्रीराम लागू रंग अवकाश येथील ‘खयाल’ या नव्या सांगीतिक उपक्रमाच्या शुभारंभाचे. ‘समीप मैफली’ची संकल्पना घेऊन सुरू करण्यात आलेल्या ‘खयाल’ या उपक्रमाची सुरवात पं. मुकुल शिवपुत्र यांच्या मैफलीने गुरुवारी रात्री झाली. यावेळी पं. मुकुल शिवपुत्र बोलत होते. ज्येष्ठ अभिनेत्री दीपा लागू यांनी पं. शिवपुत्र यांचे स्वागत केले.
पं. शिवपुत्र म्हणाले, “संगीत ही सूर, लयीची भाषा आहे. रागसंगीताच्या माध्यमातून तिचा विस्तार झाला. लोकसंगीतातूनही ती प्रवाहित झाली. प्रत्येक कलाकार, संगीतकार जे सांगत असतो, ते ऐकण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी म्यूझिक सर्कल साह्यभूत ठरतात. संगीत नादमय आहे. तो नाद रसिकांसमोर दृष्यरूप साकार करू शकतो. नादामध्ये ते सामर्थ्य असते. त्यामुळे रसिकांनी नादाचे अवगाहन केले पाहिजे. आजचा काळ दृष्यमाध्यमाच्या अतिरेकाचा झाल्याने आपण श्रवण विसरत चाललो आहोत”, याची खंत शिवपुत्र यांनी व्यक्त केली. मैफलीला प्रारंभ करण्याआधी पं. मुकुल यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांचे स्मरण केले आणि आजची मैफल मी उस्तादजींच्या स्मृतींना समर्पित करतो, अशी भावना व्यक्त केली.
खयाल मैफलीची सुरवात पं. शिवपुत्र यांनी राग शुद्ध कल्याणमधील पारंपरिक रचनेने केली. बडा ख्याल विलंबित एकतालात निबद्ध होता. ‘बोलन लागी पपिहा री’ असे बंदिशीचे शब्द होते. त्याचा जोडख्याल मध्यलय त्रितालात होता. ‘दिल दा मालक है साई’ असे शब्द होते. त्यानंतर बहार रागातील ‘सकल बन फूल रही सरसो’ ही पारंपरिक बंदिश मध्यलय तीनतालात त्यांनी सादर केली. मध्यंतरानंतर राग बसंत मध्ये बडा ख्याल मध्यलय तीनतालात ‘का करऊ प्रभू कैसन ध्याऊ’ आणि तीन तालात तराणा सादर केला. सिन्ध भैरवीने त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना सुनील जायफळकर (तबला), लीलाधर चक्रदेव (संवादिनी) तसेच संकेत भोजणे, श्रद्धा सावंत यांनी तानपुरासाथ केली.
रसिकांना ‘समीप मैफली’ चा आनंद मिळावा, हाच उद्देश
‘श्रीराम लागू रंग अवकाश’चा प्रारंभ गतवर्षी झाला तेव्हाच, हा रंग अवकाश ‘समीप मैफली’साठी आदर्श ठरू शकतो, याची जाणीव झाली होती. त्या जाणिवेचे मूर्त रूप ‘खयाल’ या उपक्रमाच्या माध्यमातून आज साकार होत आहे, याचा मनस्वी आनंद आणि समाधान आहे. मुख्य म्हणजे ‘खयाल’ ची सुरुवात आचार्य पं. मुकुल शिवपुत्र यांच्या प्रतिभासंपन्न गायनाने व्हावी, हे औचित्यपूर्ण आहे. अशा प्रकारच्या समीप मैफली पूर्वी होत असत. कलाकार आणि रसिक यांच्यात इतर कुठलाही अंतराय निर्माण न करता, रसिकांना कलाविष्कार थेट आणि मनमुराद अनुभवता यावा, हीच ‘खयाल’ ची संकल्पना आहे. या उपक्रमा अंतर्गत दोन महिन्यांतून एकदा समीप मैफलीचे आयोजन केले जाईल. मान्यवर गायक आणि वादक यांना मुक्त सादरीकरण करता येईल आणि रसिकांना तादात्म्य पावणारा कलाविष्कार पाहता येईल. वेळेची वा अन्य कुठलीही बंधने, अडथळे वा मर्यादा नसतील. कलाकार आणि रसिक यांना मनमुक्त कलानंद मिळेल, असा विश्वास यामागे आहे. मैफलींचे आयोजन ज्येष्ठ संपादक आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद संगोराम करतील, अशी माहिती श्रीराम लागू रंग अवकाश’चे राजेश देशमुख यांनी दिली.
