Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

भारताची ज्ञान आणि ध्यान परंपरा मोडायला निघालेल्यांची संख्या अधिक – डॉ. नितीश भारद्वाज

 

पुणे – भारताची ज्ञान आणि ध्यान परंपरा मोठी आहे, पण ते मोडायला निघालेल्या लोकांची संख्या अधिक दिसत आहे, त्याला आपण सावरून घेण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक डॉ. नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केले. आदिनाथ साळवी व वैशाली साळवी यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘विधिलिखित ज्योतिष त्रिदशकोत्तर सोहळा -२०२५’ या कार्यक्रमाच्या समारोप समारंभाला भारद्वाज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. सुभाष महाजन, डॉ. दत्तप्रसाद चव्हाण, विधिलिखित संस्थेचे संस्थापक आदिनाथ साळवी आणि अॅड. वैशाली साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात डॉ. नितीश भारद्वाज म्हणाले, “जगामध्ये सध्या अनेक विचारांचे मंथन सुरु आहे, जे भारतीय आहे त्याला घालून पाडायचे, गुरुत्वाकर्षण म्हणजे न्यूटन. आम्हाला जे शिकवले ते ब्रिटिशांनी, पण भारताची ज्ञान आणि ध्यानाची परंपरा मोठी असल्याचे सांगतानाच ते मोडायला निघालेले लोक देखील जास्त आहे, त्यापासून आपण सावरायला हवे. आपल्या देशाचे नाव हे भारत आहे त्यामुळे आपण इंडिया असे न म्हणता भारत असाच त्याचा उल्लेख करायला हवा. कोणत्याही प्राचीन शास्त्रामध्ये भारताचा उल्लेख इंडिया असा नाही, ग्रीक साहित्यामध्ये या देशाचे नाव इंडिका असे लिहिले गेले आहे. इंडिया ना नामकरण ब्रिटिशांनी केले. ब्रिटिशांनी भारतात आणलेली शिक्षण पद्धती ही मेकॉलेने घालून दिलेली आहे, ती नोकरशहा, कारकून आणि गुलाम बनवण्याची मानसिकता तयार करणारी आहे.”

कर्म मार्ग हाच धर्म मार्ग असून कर्म हे जात, धर्म यांच्या पलीकडे जावून प्रत्येकाला लागू होते. आपल्यामध्ये असणारी भक्ती खूप वाढली तर आपण अंधश्रद्धेकडे जाऊ शकतो. तसेच ज्ञान देखील खूप जास्त वाढल्यास अहंकार वाढू शकतो, त्यामुळे जीवनात या गोष्टींचा विचार करून पुढे जाणे आवश्यक आहे. ज्योतिष हे एक शास्त्र आहे हे सांगताना त्यामध्ये अनेक गुण समाविष्ट आहेत. सूर्य, चंद्र, मंगळ यासारखे बलाढ्य ग्रह हे परिणाम करत असतात. चंद्राच्या कलेचा परिणाम समुद्राच्या पाण्यावर होत असतो, तिथे भरती-ओहोटी येत असते, माणसाच्या शरीरात देखील ७० ते ८० टक्के पाणी आहे, त्यामुळे त्याचा परिणाम तिथे देखील नक्कीच होत असणार. सूर्य हा ऊर्जा देणारा ग्रह आहे, त्याचा परिणाम देखील माणसावर होत असतो, त्यामुळे ज्योतिष हे शास्त्र असल्याचे आपण मानतो असे डॉ. नितीश भारद्वाज यावेळी नमूद केले.

भविष्य काळात आपण आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून समाज आणि धर्म रक्षणाचे काम करण्याची आवश्यक आहे, तसे झाले तर भारत जागतिक महासत्ता झाल्याखेरीज राहणार नाही. तसेच भविष्यात समलिंगी विवाह किंवा विवाह न करणे यासारख्या समस्या उग्र रूप धारण करू शकतात. हा धोका आधीच ओळखून त्यावर अधिक काम करण्याची गरज असल्याचे मत आदिनाथ साळवी यांनी यावेळी व्यक्त केले. ज्योतिषशास्त्रामध्ये आपला कोणी गुरु नाही, पण चांगले काम करायचे हेच मुख्य ध्येय ठेवून आपण काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी य. न. मग्गीरवार, सिद्धेश्वर मारटकर, सुरेंद्र पटवर्धन व गोविंद हेंद्रे यांचा विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मच्छिंद्र नामदेव साळवी स्मृती निबंध स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार पटकाविणाऱ्या डॉ. उमेश सांगवीकर, श्रद्धा बेळगी व समीर खोत यांना देखील यावेळी बक्षिसे देण्यात आली. श्रोत्यांच्या मतदानाने मिळालेला विधिलिखित ज्योतिष महर्षी पुरस्कार डॉ. दत्तप्रसाद चव्हाण, जितेंद्र वझे, डॉ. विजय महाजन, मुग्धा पत्की, प्राची मलमकर, शुभांगिनी पांगारकर व अपर्णा गोरेगावकर यांना प्रदान करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading