‘सिनेमाच्या बाजारीकरणात मी मधला मार्ग शोधतो’
पुणे : “चित्रपटांचे खूप बाजारीकरण झाले आहे आणि लोक आपल्याकडून जास्त रक्तबंबाळ, हिंसा आणि अतिशयोक्तीची अपेक्षा करत असतात. पण मी सत्यजीत रेंना आदर्श मानतो आणि मला साधे, खरे सिनेमे करायचे आहेत त्यामुळे या बाजारीकरणात टिकण्यासाठी मी एक मधला मार्ग शोधत सिनेमे काढतो.” २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट विभागात तामिळ भाषेतील ‘कोझीपण्णाई चेल्लादुराई’ हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचे दिग्दर्शक सीनू रामासामी यांनी संवाद साधला.
रामासामी म्हणाले, “या चित्रपटाची कथा, ही मी तरुण असताना गावाकडे जवळून अनुभवलेली आहे. कथा चेल्लादुराई नावाच्या मुलाभोवती फिरते आणि चित्रपटाची प्रमुख संकल्पना क्षमाशीलता आहे. हा चित्रपट म्हणजे सामाजिक समस्या, कौटुंबिक नातेसंबंध, आणि ग्रामीण राहणी या विषयांवर भाष्य करतो.
‘कोझीपण्णाई चेल्लादुराई’ ओकलँडच्या चित्रपट महोत्सवात देखील दाखवण्यात आला होता. ओ. टी. टी. वर देखील हा सिनेमा उपलब्ध आहे. दोन्ही माध्यमांबद्दल सीनू रामासामी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “ओ. टी. टी. चांगले की वाईट ही चर्चा चुकीची आहे. प्रत्येकाकडे आज माध्यमे आहेत. प्रत्येक जण जाणकार आहे. महोत्सवात दाखविल्याने चित्रपट जगभर पोहोचतो आणि मग ओ. टी. टी. वर जाऊन लोक सिनेमे बघतात.”
‘अगेन्स्ट द टाईड’ हा माहितीपट महोत्सवात दाखवण्यात आला. त्यानंतर माहितीपटाच्या दिग्दर्शिका सार्वनिक कौर यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “जुन्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो, कथा तीच राहते, पण तिचा अर्थ बदलतो.” त्या म्हणाल्या, की ‘अगेन्स्ट द टाईड’ या माहितीपटात मुंबईतील कोळी समाजातील दोन मच्छीमारांची कथा आहे. राकेश आणि गणेश हे दोघेही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतात, पण त्यांच्यात एक महत्त्वाचा फरक आहे. राकेश अजूनही मासेमारीच्या जुन्या पद्धतींवर विश्वास ठेवतो, तर गणेशने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे.
कौर या आधुनिक विचारसरणी आणि वैज्ञानिक प्रगतीवर प्रश्नचिन्ह उभे करतात. त्यांच्या माहितीपटांमधून माणसाच्या जीवनातील चिंता आणि संघर्ष समोर येतात. ‘अगेंस्ट द टाईड’ मध्येही त्यांनी मच्छीमारांच्या जीवनातील अडचणी, शासनाची उदासीनता आणि हवामानातील बदल हे मुद्दे प्रभावीपणे दाखवले आहेत.
