Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

राजकीय साक्षर तरुणच देशात सकारात्मक बदल घडवू शकतात – आमदार हेमंत पाटील

 

पुणे : राजकारणात येण्याची तरुणांना स्वतःहून इच्छा होत नाही, कारण तरुणांचा आणि एक प्रकारे समाजाचाच राजकारणाप्रती असणारा दृष्टिकोन हा दूषित झालेला आहे. याला बऱ्याच प्रमाणात राजकारणीही कारणीभूत आहेत. राजकारणाविषयी असणारी नकारात्मकता दूर करण्यासाठी तरुणांनी प्रथमतः राजकीय दृष्ट्या साक्षर झाले पाहिजे. राजकीय दृष्ट्या सजग आणि साक्षर असणारे तरुणच खऱ्या अर्थाने समाजामध्ये सकारात्मक बदल घडवू शकतात, असे मत आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आठव्या युवा संसद कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत पाटील बोलत होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते. आमदार सत्यजित तांबे, कैलास पाटील यांना यावेळी आदर्श आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले, तसेच गजानन काळे आणि अजिंक्य सगरे यांना यावेळी आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर लिखित मानवी कल्याणाचे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले.

हेमंत पाटील म्हणाले, चारित्र्यवान लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी समाजाने डोळसपणे मतदान करणे गरजेचे आहे. केवळ एक वेळा मतदान करून आपली जबाबदारी संपत नाही तर राजकारण्याना प्रश्न विचारत राहणे हे सजग समाजाचे काम आहे. राजकारण्यांवर समाजाचा अंकुश असेल तर निश्चितच राजकारणी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करू शकतात लोकप्रतिनिधी प्रशिक्षणासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने एक संस्था उभारून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही हेमंत पाटील यांनी यावेळी केले.

कैलास पाटील म्हणाले, राजकारणामध्ये सध्या आदर्श हा शब्द राहिलेला नाही राजकारण म्हणजे वाईटच असते अशी मानसिकता निर्माण झाली आहे. अनेक जण राजकारणामध्ये येऊ शकतात, परंतु राजकारणामध्ये यशस्वी होणे हे सोपे राहिलेले नाही. वैचारिक मतभेद असणे वेगळे आणि वैर असणे वेगळे सध्याच्या राजकारणाला वैराचे स्वरूप आले आहे. तरुणांनी राजकीय दृष्ट्या साक्षर झाले तरच खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या राजकारणातून महाराष्ट्र मुक्त होऊ शकेल. जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन राजकीय साक्षरता जर समाजामध्ये आली तर सुशिक्षित नेते निर्माण होतील आणि समृद्ध समाज निर्मितीसाठी आपण हातभार लावू शकतो.

सत्यजित तांबे म्हणाले विद्यार्थी चळवळी मध्ये राजकारणाचा पाया घालण्याचे सामर्थ्य असते. अनेक विद्यार्थी चळवळीतील नेते हे देशाचे नेते बनले आणि त्यांनी समाज सुधारण्याचे काम केले. मुलींचे राजकारणामध्ये येण्याचे प्रमाण आजही कमी आहे कारण आपण त्या प्रकारे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास असमर्थ ठरलो आहोत. मुलींच्या आई-वडिलांना मुलींची काळजी वाटणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करू शकलो, तरच मुली बिनधास्तपणे राजकारणामध्ये येऊ शकतात.

गजानन काळे म्हणाले, पुरस्कारांचे पॅकेज सुरू असणाऱ्या आजच्या युगामध्ये खऱ्या अर्थाने धडपडणाऱ्या आणि समाजासाठी काहीतरी करणाऱ्या युवकांसाठी युवा संसदेसारखा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने आदर्श घालून दिला आहे. या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थीच घडत नाहीत तर विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाप्रती सकारात्मक दृष्टिकोनही निर्माण होत आहे अशा प्रकारे युवा संसद उपक्रम हा नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहकार्याने आयोजित करावा असे आवाहनही गजानन काळे यांनी यावेळी केले.

अजिंक्य सगरे म्हणाले, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या पुरस्कारामुळे काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे तरुणांनी राजकारणामध्ये येणे गरजेचे आहे, तत्पूर्वी शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या आपण सक्षम असले पाहिजे तसेच समाजाप्रती आपली बांधिलकी असणे गरजेचे आहे. आपल्या मनामध्ये समाजाप्रती जर तळमळ असेल तरच आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. सुशिक्षित तरुण जर राजकारणामध्ये आले तर राजकारण शुद्ध होईल, शिक्षण क्षेत्रामध्ये ती शक्ती आहे त्यामुळेच जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या युवा संसद उपक्रमामुळे उद्याचे सुशिक्षित राजकारणी घडण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ॲड. शार्दुल जाधवर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading