गानसरस्वती महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचा पूर्वार्ध ठरला श्रवणीय
नाट्यसंपदा प्रतिष्ठान आयोजित अकराव्या ‘गानसरस्वती महोत्सवा’च्या पाचव्या सत्राचा पूर्वार्ध राजस आणि तेजस उपाध्ये यांच्या आश्वासक व्हायोलिन वादनाने आनंददायी ठरला.
गानसरस्वती महोत्सवाचे तिसऱ्या आणि अखेरच्या दिवसाचे पहिले सत्र रविवारी ४ वाजता सुरू झाले. ‘व्हायोलीन ब्रदर्स’ म्हणून ओळखले जाणार्या राजस आणि तेजस उपाध्ये यांनी वादनाची सुरवात राग ‘हंसध्वनी’ ने केली. हे दोघेही बंधू सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांचे शिष्य व सुपुत्र आहेत. कर्नाटक संगीतातून उत्तर हिंदुस्थानी संगीतात स्थिरावलेल्या या रागात आटोपशीर आलापी करून त्यांनी रागरूप दर्शवले. तबल्याची साथ सुरू झाल्यावर या दोघांनीही झपताल आणि त्रितालात काही काळ एकल वादनाचा आनंदही रसिकांना दिला. द्रुत आणि अतिद्रुत लयीतील वादनात त्यांना युवा तबलावादक ईशान घोष यांनी तबल्यावर अतिशय ढंगदार साथ केली.
यानंतर सुप्रसिद्ध गायिका मंजुषा कुलकर्णी – पाटील यांचे गायन झाले. त्यांनी राग ‘श्री’ मध्ये दोन पारंपरिक रचना सादर केल्या. ‘गजरवा बाजो’ ही रचना तिलवाडा तालात निबद्ध होती. तर ‘एरी हूं तो’ ही द्रुत रचना तीनतालातील होती. याला जोडून ‘सांझ भरी रे अजहु न आये प्रीतम मेरो’ ही द्रुत बंदिशही त्यांनी सादर केली. राग छायानट मध्ये मध्यलय बंदिश आणि तनन सेरेना तारेदानी हा तराणा त्यांनी पेश केला. ‘मालनिया गुॅंद लाओ री’ ही त्रितालातील रचना सादर करून त्यांनी विराम घेतला.
त्यांना प्रशांत पांडव (तबला), आणि सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) यांनी साथसंगत केली. अनुष्का साने आणि नुपूर देसाई यांनी तानपुरा साथ केली.
‘हे व्यासपीठ अतिशय पवित्र आणि प्रासादिक आहे. इथे गायनसेवा करण्याची संधी मिळाली, याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.
विघ्नेश जोशी यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.
