Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

विकासाचे राजकारणच देशाला महाशक्ती बनवू शकते

  • जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसच्या ८ व्या युवा संसद मध्ये ‘ व्हिजन भारत २०२९’ मध्ये मान्यवरांचे मत

पुणे: विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये एआय सारख्या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार कमी होणार आहे, त्यामुळे तरुणांसमोर मोठे प्रश्न निर्माण होणार आहे. अशावेळी बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देणे आणि त्यांचा देशाच्या विकासासाठी उपयोग करून घेणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. धर्म जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन जर विकासाचे राजकारण झाले तरच भारत खऱ्या अर्थाने महासत्ता बनू शकतो, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.

जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ८ व्या युवा संसद मध्ये ‘व्हिजन भारत २०२९’ या विषयावर विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार निलेश खरे, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर उपस्थित होते. यावेळी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, सुशील मेंगडे यांना आदर्श नगरसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.

निलेश खरे म्हणाले, तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे तंत्रज्ञानामुळे माणसाचे आयुष्य जरी सहज सोपे झाले असले तरी त्याच्या समोरील अडचणी मात्र वाढल्या आहेत. रोजगार झपाट्याने कमी होत आहेत, येत्या काही वर्षांमध्ये तीन लाख रोजगार कमी होणार आहेत, अशा वेळी बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणे हे देशासमोरील मोठे आव्हान आहे. देशाचे उत्पादन क्षमता वाढविणे गरजेचे आहे कार्यकर्ता हा कार्यकर्ता राहिलेला नाही तर खंडणीकर्ता झालेला आहे, अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती आहे, यामुळे उद्योगधंदे उभारण्यास अडचणी येतात त्यामुळे निश्चितच पुन्हा रोजगार निर्मिती होत नाही अशावेळी तरुणांचे भविष्य धोक्यात आहे. त्यामुळे जात धर्माच्या पलीकडे जाऊन विकासाचे राजकारण होणे गरजेचे आहे.

प्रसन्न जोशी म्हणाले, राजकारणामध्ये प्रत्येकालाच निवडणूक लढवता येणार नाही, तसेच प्रत्येक जण आमदार खासदार होऊ शकत नाही, परंतु समाज माध्यमांचा उपयोग करून आपल्या व्यथा आणि तळमळ आपण मांडू शकतो समाजाचे प्रश्न समाज माध्यमांमध्ये मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू शकतो. समाज माध्यमांचा उपयोग करून आपला ब्रँड बनवा आणि त्याचा उपयोग स्वतःसाठी आणि समाज उभारणीसाठी आपण करू शकतो.

राजेंद्र शिळीमकर म्हणाले, कार्यकर्ता हा सर्वसामान्य माणसाला मदत करणारा सर्वाधिक पहिला घटक असतो. कार्यकर्ता हा कायमच चुकीचा असतो असे नाही तर राजकारण क्षेत्रामध्ये घडण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे कार्यकर्ता असते. कार्यकर्त्याच्या माध्यमातूनच पक्ष आणि पक्षाचे धोरण घराघरांमध्ये पोहोचतात. समाजाविषयी तळमळ असेल तरच खऱ्या अर्थाने कार्यकर्ता बनतो. जो व्यक्ती चांगला कार्यकर्ता असतो तोच चांगला नेता होऊ शकतो त्यामुळे नेता होण्याआधी प्रत्येकाने एक चांगला कार्यकर्ता होणे गरजेचे आहे.

सुशील मेंगडे म्हणाले, समाजाची आणि आपली एक मानसिक चौकट निर्माण झालेली आहे. गुंडगिरी आणि भ्रष्टाचार म्हणजेच राजकारण ही मानसिकता आपण दूर केली पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन जर सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये आले तर खऱ्या अर्थाने राजकारणालाही सकारात्मक वळण येऊ शकते. केवळ राजकारण्यांना दोष देऊन प्रश्न सुटणार नाहीत तर सकारात्मक राजकारण घडावे अशी अपेक्षा असेल तर सुशिक्षित तरुणांनी सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रत्यक्ष राजकारणामध्ये उतरले पाहिजे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading