पं. कोपरकर, पं. पोटे, मानस गोसावी आणि शंतनू गोखले यांचा वसंतोत्सव पुरस्काराने सन्मान
पुणे : ज्येष्ठ गायक स्व. पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारे ‘वसंतोत्सव पुरस्कार’ यावर्षी ज्येष्ठ गायक व गुरु पं. विजय कोपरकर, संगीताचार्य पं. सुधीर पोटे, युवा मोहनवीणा वादक मानस गोसावी आणि संतूर वादक डॉ. शंतनू गोखले यांना नुकत्याच झालेल्या वसंतोत्सवात प्रदान करण्यात आले.
कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म्स येथे नुकताच १८ वा वसंतोत्सव संपन्न झाला यावेळी तिसऱ्या दिवशीच्या सुरुवातीला या सर्वांना वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानचे बापू देशपांडे आणि वंदना देशपांडे यांच्या हस्ते वसंतोत्सव पुरस्कार प्रदान करीत गौरविण्यात आले. यावेळी सुप्रसिद्ध संवादिनीवादक डॉ. चैतन्य कुंटे हे देखील उपस्थित होते. सदर वर्ष हे या पुरस्कारांचे ११ वे वर्ष होते. दरवर्षी संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार वा गुरु, संगीत अभ्यासक कलाकार वा संशोधक आणि युवा कलाकार यांना प्रतिष्ठानच्या वतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. कलाकार व संशोधक यांना मानपत्र व रोख रुपये ५० हजार तर युवा कलाकारास मानपत्र व रोख २५,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
