‘अभ्यासपूर्ण तरीही वाचकांना रुचेल, अशी मंजुश्री गोखले यांच्या लेखनाची किमया’
मंजुश्री गोखले लिखित ‘ज्ञानयोगी एकनाथ’ कादंबरीचे प्रकाशन संपन्न
पुणे : “अभ्यासपूर्वक मांडणी असूनही, समीक्षाग्रंथांचे काठिण्य टाळून, सर्वसामान्यांना रुचेल आणि आवडेल, अशा पद्धतीने संत एकनाथांचे कार्य मांडण्याची किमया मंजुश्री गोखले यांनी ‘ज्ञानयोगी एकनाथ’ या कादंबरीच्या माध्यमातून केली आहे”, असे मत संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने कर्वे रस्त्यावरील स्वामीकृपा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात मंजुश्री गोखले लिखित ‘ज्ञानयोगी एकनाथ’ या कादंबरीचा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
लेखिका गोखले, इंडियन रेडक्राॅस सोसायटीचे सचिव रमेश कुलकर्णी, विंग कमांडर (निवृत्त) विजय चतुर, तसेच लेखिका आरती मोने आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने संशोधित ‘जगन्नाथ शंकरशेठ यांचे शैक्षणिक कार्य’, या पुस्तिकेचे प्रकाशनही कार्यक्रमा दरम्यान करण्यात आले. तर ज्येष्ठ लेखिका डॉ. कुमुद गोसावी यांचा ‘आदर्श सहधर्मचारिणी’ पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमावेळी बोलताना डॉ. कामत म्हणाले, “संत एकनाथांविषयीचे कादंबरीलेखन करताना डॉ. मंजुश्री यांनी लेखनसाधना केली आहे. संतांविषय़ी काही लेखन करताना पूर्वीच्या काही कटू अनुभवांचे दडपण त्यांनी घेतलेले नाही, याबद्दल त्या अभिनंदनास पात्र आहेत. पंधराव्या शतकात संत एकनाथांनी वारकरी संप्रदायाची मुद्रा ठळक करण्याचे कार्य केले. एकूणच मंदिरातले देव संतांनी भक्तीमार्गाने घराघरात व मनामनात पोचवले. एकनाथांनी या प्रक्रियेत असाधारण योगदान दिले आहे. समीक्षाग्रंथ संतकार्याची मांडणी जरूर करतात, पण ते ग्रंथ अभ्यासकांपुरतेच राहतात. कादंबरीसारख्या माध्यमातून संतांचे कार्य सर्वसामान्य वाचकांपर्यंत नेण्याचे कार्य मंजुश्री यांनी उत्तम रीतीने केले आहे”.
मनोगत मांडताना लेखिका मंजुश्री गोखले म्हणाल्या, “ज्ञानयोगी एकनाथ’ हे माझे ५० वे पुस्तक असून, संत मालिकेतील १० वी कादंबरी आहे. वारकरी संप्रदायात ‘ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका’, असा संकेत प्रचलित आहे. संत एकनाथांनी ६६ वर्षांच्या आयुष्यात विविध प्रकारच्या रचनाप्रकारांचे वैविध्य जपून लेखन केले. त्यातून तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व राजकीय संदर्भांचे पुरावे मिळतात. संतसाहित्यावर विद्यापीठ स्तरावर प्रबंधलेखन होते, पण प्रबंध विद्यापिठीय कक्षेबाहेर येत नाहीत. त्यामुळे संत, त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी कादंबरीसारखा वाचकप्रिय साहित्यप्रकार निवडला आणि लेखन केले.”
विंग कमांडर विजय चतुर म्हणाले, “प्रत्येक महान व्यक्तिमत्वाला आपण विशिष्ट धर्म, जात, प्रांत, भाषा, वर्ग अशा कप्प्यांमध्ये बंद करत आहोत. प्रत्यक्षात ही महान व्यक्तिमत्त्वे सर्व देशाची आहेत. त्यांना अशी प्रदेशमर्यादा घालता कामा नये आणि याच भूमिकेतून मांडणी केली जावी.”
आरती मोने यांनी डॉ. कुमुद गोसावी यांच्या ‘एकोबा’ या कादंबरीचा परिचय करून दिला. रमेश कुलकर्णी यांनीही मनोगत मांडले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या समन्वयक शुभदा वर्तक यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
