Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

१२ वा तालचक्र महोत्सव उस्ताद झाकीर हुसैन यांना समर्पित

‘जिक्र उस्ताद का… ‘ या मध्यवर्ती संकल्पनेवर दिग्गज कलाकारांनी केली सादरीकरणे

पुणे : उस्ताद झाकीर हुसैन यांनी ५० वर्षांपूर्वी तयार केलेल्या तालमालेचे पहिल्यांदाच भारतात झालेले सादरीकरण, उस्तादजींनी संगीत दिलेल्या गीतांचे सादरीकरण आणि आपापल्या तालवाद्यांच्या बहारदार वादनाने उस्ताद झाकीर हुसैन यांप्रती दिग्गज कलाकारांनी वाहलेली तालांजली अशा भावनिक वातावरणात १२ वा तालचक्र महोत्सव संपन्न झाला.

तालवाद्यांना केंद्रस्थानी ठेवून सुरु करण्यात आलेला आणि प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘तालचक्र’ संगीत महोत्सवाचे हे १२ वे वर्ष उस्ताद झाकीर हुसैन यांच्या आठवणीत जणू रंगून गेले. डी पी रस्त्यावरील पंडित फार्म्स या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी हा महोत्सव संपन्न झाला.  रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश असलेल्या या महोत्सवाला रसिकांनी देखील मोठी गर्दी करीत तालवाद्य वादनाची अनुभूती घेतली.

१२ व्या तालचक्र महोत्सवाचे उद्घाटन तालचक्रचे आयोजक सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे, ममता घाटे, सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक पं अतुलकुमार उपाध्ये,  प्रवीण बढेकर, सचिन झगडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. व्हायोलिनवादक तेजस व राजस उपाध्ये हे देखील यावेळी उपस्थित होते.

उस्ताद अल्ला रखाँ साहेब यांचे शिष्य नितीन शंकर (कोंगा, जेंबे), उस्ताद तौफिक कुरेशी यांचे सुपुत्र, शिष्य आणि उस्ताद झाकिर हुसैन यांचे पुतणे शिखरनाद कुरेशी (जेंबे), उस्ताद तौफिक कुरेशी यांचे शिष्य ख्वाब हरिया (ड्रम्स व मल्टी पर्कशन्स), उस्ताद अल्ला रखाँ  साहेब तबला अकादमीचे विद्यार्थी सरदार हरमित सिंग (तबला व मल्टी पर्कशन्स) व जॉय रुपडे (मल्टी पर्कशन्स), नितीन शंकर यांचे शिष्य वरद कुलकर्णी (मल्टी पर्कशन्स), उस्ताद अल्ला रखाँ  साहेब यांचे शिष्य नवीन शर्मा (ढोलक), उस्ताद झाकीर हुसैन यांचे शिष्य असलेले अनंता आर कृष्णन (मृदंगम्) यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या सत्रात दमदार वादन करीत महोत्सवाला सुरुवात केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातील बोलताना नितीन शंकर म्हणाले, “उस्ताद झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित जिक्र उस्ताद का… हा  कार्यक्रम आम्हा सर्वांसाठीच भावनिक पातळीवर खूप महत्त्वाचा आहे. यानिमित्ताने उस्ताद झाकीर हुसैन यांनी ५० वर्षांपूर्वी तयार केलेली तालमाला आम्ही सादर करीत आहोत.”

उस्ताद झाकीर हुसैन यांच्याशी काही दिवसांपूर्वीच या तालमालेबद्दल ऑनलाईन चर्चा झाली होती, त्यांनी ही तालमाला मला व शिखरनाद कुरेशी यांना शिकवली. याचे सादरीकरण हे प्रथमच भारतात होत असल्याची माहिती शंकर यांनी दिली. या तालमालेत वेगवेगळी आवर्तने, कायदे, पेशकार आणि उस्ताद अल्ला रखाँ  साहेब यांच्या काही रचना यांचा समावेश होता. यानंतर नवीन शर्मा आणि अनंता आर कृष्णन यांनी काही पेशकर प्रस्तुत केले. त्यांना  अभिषेक शिनकर यांनी संवादिनीवर साथ केली. यानंतर नितीन शंकर यांनी नऊ मात्रांची रचना सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी सादर केलेली बॉलिवूड संगीतातील प्रसिद्ध अशी सोल बीट रचना उपस्थितांना भावली. बॉलिवूड संगीतातील अनेक गाण्यांबरोबरच प्रामुख्याने आर डी बर्मन यांच्या गाण्यात हे बीट वापरले असल्याची माहितीही शंकर यांनी दिली. नितीन शंकर आणि सहकारी यांच्या जुगलबंदीने या महोत्सवच्या पहिल्या सत्राचा समारोप झाला.

झाकीर हुसैन हे केवळ पहिल्या क्रमांकाचे कलाकार नव्हते तर ते एकात्मेवातद्वितीय असे कलाकार होते असे सांगत नितीन शंकर म्हणाले की, झाकीर हुसैन हे ध्रुवताऱ्या सारखेच अढळ आहेत, ते जेथे असतील तेथून आम्हाला आशीर्वाद देतील हेच आमचे मागणे आहे. जोवर पृथ्वी आहे तोवर त्यांचे नाव निघत राहील. तबला म्हटलं की सर्वांना उस्ताद झाकिर हुसैन आठवणारच ही त्यांची कीर्ती होती. त्यांच्याकडून शिकण्याची मिळालेली संधी ही ग्रामी व ऑस्कर सारख्या पुरस्कारांपेक्षा आमच्यासाठी मोठीच आहे. कोणताही संगीत प्रकार असला तरी उस्तादजींचे वादन हे सरसच असायचे. उस्ताद झाकीर हुसैन हे आमच्यासाठी तालाचे देवता होते.”

माझ्या आयुष्यातला सर्वांत प्रिय विषय असलेल्या उस्ताद झाकीर हुसैन यांचा आज अप्रिय कारणामुळे उल्लेख करावा लागतोय ही बाब क्लेशदायक आहे. आमच्या कोणाहीकडे आज शब्दच नाहीत अशी अवस्था आहे. ‘जिक्र उस्ताद का’ या संकल्पनेद्वारे आम्ही सर्वच जण आपापल्या वाद्यांच्या माध्यमातून त्यांची आठवण काढतोय आणि यानंतरही काढत राहू अशा शब्दांत पद्मश्री पं. विजय घाटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

सई परांजपे दिग्दर्शित साज या चित्रपटाचे संगीत उस्ताद झाकीर हुसैन यांनी दिले होते या चित्रपटातील ‘फिर भोर भयी…’ ही रचना यावेळी सुरंजन खंडाळकर यांनी गायली. यानंतर विजय घाटे यांचे एकल तबलावादन झाले. त्यानंतर शीतल कोलवलकर यांनी तरण शृंखला प्रस्तुत केली. यानंतर पंडित विजय घाटे, सेल्वा गणेश (खंजीरा), आणि नवीन शर्मा यांची  जुगलबंदी रंगली. या सत्राच्या अखेरीस सेनिया घराण्याचे सुप्रसिद्ध बासरीवादक व ग्रामी पुरस्कार विजेते राकेश चौरसिया आणि ढोलकीवादक निलेश परब यांच्या वादनाने पुणेकरांवर जणू मोहिनी घातली. एकीकडे रसिक राकेश चौरसिया यांच्या चित्रपट संगीताच्या धून वर डोलत होते तर दुसरीकडे निलेश परब यांचे ढोलकीवादन रसिकांना उत्स्फूर्तपणे टाळ्या शिट्या वाजविण्यास प्रवृत्त करीत होते. या दोघांची पं. विजय घाटे, सेल्वा गणेश (खंजीरा), नवीन शर्मा (ढोलक), अनंता आर कृष्णन (मृदंगम्) व शिखरनाद कुरेशी यांसोबत झालेली जुगलबंदी महोत्सवाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. उस्ताद झाकीर हुसैन यांच्यातबला वादनाची चित्रफित दाखवीत महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले तर निलेश यादव यांनी साउंड इंजिनियर म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading