Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा आणि सरकारला सहकार्य करावे – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर:  संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणासारख्या संवेदनशील प्रकरणी आंदोलने, घोषणाबाजी, पत्रकबाजी न करता संबंधित प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध पक्ष आणि संघटनांना केले आहे. 

भाजपने दीड कोटी नवीन सदस्य नोंदणी करण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते. अभियानाचा दुसरा टप्पा दहा तारखेला सुरू होणार असून त्यामध्ये घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करण्याचा कार्यक्रम भाजपाने कार्यकर्त्यांना दिला आहे. या मोहिमेअंतर्गत नगरसेवकांपासून खासदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी घरोघरी जाऊन नव्या सदस्यांची नोंदणी करणार आहेत. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरण हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. अशा प्रकरणात राजकारणासाठी विरोध न करता सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. अशा प्रकरणात मोर्चे, आंदोलने, घोषणाबाजी, पत्रकबाजी केल्याने काहीच साध्य होत नाही. मात्र, तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकरणी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी सरकार आणि तपास यंत्रणांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. 

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरील उपाय होऊ शकत नाही. उलट त्यामुळे कुटुंबीयांच्या समस्यांमध्ये वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा टोकाचा मार्ग न पत्करता सकारात्मक विचार ठेवावा. सरकार निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही देखील बावनकुळे यांनी यावेळी बोलताना दिली. महायुती सरकारच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा देखील त्यांनी केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading