मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा,राज्यपालांकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली आहे. या प्रकरणातया मागणीला राज्यपालांकडून काय प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करावा, ही देखील शिष्टमंडळाची मागणी आहे.
देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हा या प्रकरणाच्या मुळाशी असल्याचा आरोप केला जात आहे. मुंडे मंत्री पदावर असेपर्यंत या प्रकरणाचा तपास करताना तपास यंत्रणांवर दबाव येण्याची शक्यता असल्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत राजीनामा घेऊन त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवावे, अशी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी आहे.
सत्ताधारी महायुतीमध्ये मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी देखील देशमुख हत्या प्रकरण घडल्यापासून मुंडे यांच्या राजीनाम्याच मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मराठवाड्यातील सर्व आमदार एकमुखाने मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करीत आहेत. धनंजय मुंडे मंत्री पदी राहिल्यास जनतेच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा त्यांचा दावा आहे. विशेषतः धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यास मराठा समाज पक्षाकडे पाठ फिरवेल, असा गर्भित इशारा या आमदारांनी दिला आहे.
