मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल
बीड: प्रतिनिधी
मंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आणि समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर बीड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी, देशमुख कुटुंबीयांच्या केसाला धक्का लागला तर मराठा समाज धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असे विधान केले होते.
हे विधान समाजात दुही निर्माण करणारे आणि धनंजय मुंडे यांची बदनामी करणारे असल्याची तक्रार तुकाराम अघाव यांनी बीड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीवरून जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निघृण हत्या करण्यात आली. यानंतर आपल्या जीवाला धोका असल्याचे सूचित करून देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड या हत्या प्रकरणाच्या मुळाशी असल्याचा आरोप केला जात आहे.
