शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
नवी दिल्ली: प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर सातारा जिल्ह्यातील डाळिंबाचे बागायतदार शेतकरी होते. ही भेट राजकीय स्वरूपाची नसून फळबागायतीशी संबंधित असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. केवळ पाच मिनिटातच ही भेट पार पडल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांनी मोदी यांना डाळिंबही भेट दिली.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर झालेल्या शरद पवार आणि मोदी यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ही भेट राजकीय स्वरूपाची नसल्याचे पवार यांनी सांगितले असले तरी देखील या भेटीमुळे राज्यातील राजकारणात काही नवी समीकरणे जुळून येणार का, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला आव्हान देत निवडणूक चिन्हासह पक्षच ताब्यात घेतला. त्यानंतर त्यांनी पवार यांच्यावर टीका करण्याचा सपाटा लावला. मात्र, त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत केवळ त्यांच्या पक्षालाच नव्हे तर महायुतीला बसला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवारच काय, खुद्द पंतप्रधान मोदी यांनी देखील शरद पवार यांच्यावर टीका करण्याचे टाळले. त्याचे चांगले परिणाम महायुतीला मिळाले.
शरद पवार यांचा 84 वा वाढदिवस नुकताच पार पडला. पक्षात फूट पडल्यापासून आलेले वितुष्ट दूर सारून अजित पवार यांनी वाढदिवसाच्या दिवशी शरद पवार यांची सपत्नीक भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या भेटीत देखील राजकीय चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नजीकच्या भविष्यकाळात काय घडणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
