Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

दिग्गज कलाकारांच्या स्मृती जागवत ‘सवाई’च्या स्वरयज्ञाला प्रारंभ

पुणे :  कलाकारांचे आणि ‘सवाई’चे दृढ नाते आठवणींच्या रुपाने उलगडत, त्यांच्या आठवणींचा जागर करत ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला आज रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात प्रारंभ झाला. मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडासंकुल या ठिकाणी २२ डिसेंबर पर्यंत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रंगणार आहे. महोत्सवाचे आयोजन करणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रारंभीच नुकत्याच दिवंगत झालेल्या उस्ताद झाकीर हुसेन, पं. रामनारायण आणि उस्ताद रशीद खाँ या जगविख्यात कलाकारांना श्रद्धांजली अर्पण केली. 

यावेळी श्रीनिवास जोशी म्हणाले,  “६ डिसेंबर १९९२च्या मुंबई दंगलीच्या वेळी झाकीरभाई असे एकमेव कलाकार होते, जे आवर्जून मुंबईहून पुण्याला महोत्सवासाठी आले होते. झाकीरभाईंनी सवाईच्या स्वरमंचावर ६०च्या दशकापासून कला सादरीकरण केले. ते सवाईशी सदैव कनेक्टेड होते. झाकीरभाई हे तबल्यापलीकडचे व्यक्तिमत्त्व होते. पं. भीमसेनजी आणि झाकीरभाईंचे वडील उस्ताद अल्लारखा यांचा विशेष स्नेह होता. तोच धागा झाकीरभाईंनी नेहमी जपला’.

रशीद खाँ यांच्याविषयी ते म्हणाले,  “पं. भीमसेनजींनी रशीदभाईंना कोलकत्ता येथे प्रथम ऐकले आणि लगेच सवाईत निमंत्रित केले. तेव्हा कलाकार रेल्वेने प्रवास करत असत. भीमसेनजी पेट्रोल भरायला बाहेर पडले आणि थेट रशीदभाईंना घेऊनच आले होते. ही आठवण रशीद भाई कायम सांगत असत. रशीदभाईंचे आणि जोशी कुटुंबाचे तसेच सवाईच्या परिवाराचे अनौपचारिक नाते होते.”.

“पं. रामनारायण आणि पं. भीमसेनजी यांच्यात अजोड मैत्रीचा धागा होता. सारंगीचे भीष्माचार्य अशी त्यांची ओळख होती. त्यांनी साथ करण्याचे थांबवले असतानाही एकदा पं. भीमसेनजींच्या विनंतीवरून त्यांनी साथ केली होती. संगीतकार शंकर जयकिशन यांच्या विनंतीवरून वसंतबहार चित्रपटातील  ‘केतकी गुलाब जूही’ हे गाणे पंडितजी आणि पं. रामनारायण यांनी संगीतबद्ध केले होते, अशी आठवण श्रीनिवास जोशी यांनी सांगितली.

एस. बालेश आणि डॉ. कृष्णा बालेश भ्रजंत्री यांनी शहनाईवादनाने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा सुरेल प्रारंभ केला. समयोचित अशा राग मधुवंतीने त्यांनी वादनाला सुरवात केली. त्यानंतर ‘वैष्णव जन तो’ ही भक्तीरचना आणि मिश्र खमाजमधील धून सादर करून त्यांनी वादनाची सांगता केली. त्यांना प्रसाद लोहार (तबला), प्रकाश बालेश (दुग्गड), आर. के. रवीकुमार (स्वरमंडल), विनायक (तानपुरा) यांनी साथ केली. त्यानंतर शाश्वती चव्हाण झुरुंगे यांचे सवाईच्या स्वरमंचावरील पहिले सादरीकरण झाले. पं. शिवानंद स्वामी, पद्मा देशपांडे, मशकूर अली खाँ आणि वडील पं. सुधाकर चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभलेल्या युवा गायिका शाश्वती यांनी राग मुलतानी मधील  बंदिशीने सुरवात केली. ‘कंगन मुंदरिया मोरी’ ‘ या द्रुत रचनेत त्यांनी सरगमचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केला. ‘रूप पाहता लोचनी’ या अभंग रचनेने शाश्वती यांनी समारोप केला. त्यांना गंगाधर शिंदे (हार्मोनिअम), कार्तिकस्वामी (तबला), गंभीर महाराज (पखवाज), श्रेया गोगटे व श्रावणी निरोकर यांनी तानपुरा साथ तसेच माऊली टाकळकर यांनी टाळांची साथ केली.

लोकप्रिय गायक पं. राम देशपांडे यांनी आपल्या परिपक्व गायनातून जयपूर, आग्रा तसेच ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे दर्शन घडवले. राग श्री मध्ये त्यांनी विलंबित तिलवाडा तालात ‘झगमग ज्योत जगावे’ ही पं.‌ विनयचंद्र मौद्गल्य यांची रचना, त्यानंतर मध्यलय एकतालात प्रेमरंग यांची ‘सांज भयी’ ही बंदिश तर द्रुत तीनतालात ‘काली माता भवानी’ ही स्वरचित बंदिश सादर केली.

त्यानंतर बागेश्री बहार या रागातील पं. व्ही. आर. आठवले उर्फ नादपिया यांची रूपक तालातील ‘आयी बहार आयी’ ही रचना व द्रुत त्रितालातील रचना सादर केली. ‘मनमोहन मेघश्यामा’ या समर्थ रामदास यांच्या भक्तीरचनेने त्यांनी वातावरण भक्तीरसमय केले. त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), अजिंक्य जोशी (तबला), गंधार देशपांडे व अर्चना देशपांडे (गायनसाथ), गंभीर महाराज (पखवाज), माऊली टाकळकर (टाळ) तर आदित्य मोडक व स्वप्नील चाफेकर यांनी तानपुरा व स्वरसाथ केली.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी सवाई गंधर्वांचे नातू आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य स्वर्गीय पं. श्रीकांत देशपांडे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पं. श्रीकांत देशपांडे यांच्या पत्नी शीला देशपांडे, कन्या गौरी व जावई कौस्तुभ दिंडोरीकर, पं. उपेंद्र भट, आनंद भाटे, डॉ. प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे, मुकुंद संगोराम उपस्थित होते. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकाराला वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी बोलताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “श्रीकांत देशपांडे यांचे संपूर्ण जीवन संगीताला समर्पित होते. अतिशय हजरजबाबी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.” आनंद देशमुख यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading