श्रीरामांच्या जन्माने घराघरांत आनंदोत्सव हे त्यांचे श्रेष्ठत्व – पूज्य राजन जी महाराज
पुणे : आपल्या उत्सवाला संपूर्ण शहराने उत्सव समजून साजरे केले, तर त्यात आपली धन्यता आहे. प्रभू श्रीरामांनी जरी अयोध्येत एका महालामध्ये जन्म घेतला असला, तरी देखील संपूर्ण अयोध्येत प्रत्येक घरात आनंदोत्सव साजरा झाला. खऱ्या अर्थाने हेच प्रभू श्रीरामांचे श्रेष्ठत्व आहे, असे पूज्य राजन जी महाराज यांनी सांगितले.
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे आयोजित कथा सोहळ्यात चौथ्या दिवशी प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज यांनी निरूपण केले.
पूज्य राजन जी महाराज म्हणाले, श्रेष्ठ व्यक्तित्व तेच आहे, ज्याच्या येण्याने घरात दिवाळी साजरी होते. आपण कोणाच्या घरी गेलो, तर त्या घरातील वातावरण कसे आहे, याचे सूक्ष्म निरीक्षण आपण करायला हवे. त्यावेळी तिथे जर प्रसन्नता असेल तर आपले व्यक्तिमत्व योग्य आहे. अन्यथा आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल स्वतः;ला विचार करण्याची वेळ आली असल्याचे समजावे. प्रभू श्रीराम यांच्या येण्याने अयोध्येतील वातावरण कसे होते, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
ते पुढे म्हणाले, प्रभू श्रीराम अयोध्या नगरी मध्ये प्रकट झाले. जे नव्हते आणि अचानक झाले, याला प्रकट होणे म्हणतात. अग्नी प्रकट होते. सर्वत्र जे आहे, ते प्रकट होते, कारण परमेश्वर सर्वत्र आहे. अवतार म्हणजे उतरणे. आपल्याला परमेश्वर का भेटत नाही, कारण आपण परमेश्वर खूप लांब आहे, असे समजून शोधतो. जर परमेश्वर जवळ आहे, असे समजून शोधले, तर परमेश्वर आपल्या जवळच भेटू शकेल.
परमेश्वराचे रूप कसे दिसेल, याचा जसा भक्त विचार करेल. त्या रूपात भक्ताला परमेश्वराचे दर्शन होते. परमेश्वर निराकार सत्तेला सोडून भक्तांच्या विचाराप्रमाणे त्यांना दर्शन देणे हा अवतार आहे. त्यामुळे प्रेम असेल तर परमेश्वर प्राप्ती नक्कीच होईल, असेही त्यांनी सांगितले.
कथा सोहळ्याचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे करण्यात आले आहे. श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळ्यात श्री सीताराम विवाह महोत्सव, श्री केवट प्रेम, श्री राम मंगल यात्रा, श्री भरत चरित्र, श्री शबरी प्रेम, सुंदरकाण्ड आणि श्री राम राज्याभिषेक याविषयी पूज्य राजनजी महाराज हे निरूपण करीत आहेत. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
