आंबेडकरी चळवळीतील लोकनेते विजय वाकोडे यांचे निधन
परभणी : आंबेडकरी चळवळीतील बिनीचे शिलेदार, लढवय्ये नेते विजय वाकोडे यांचे सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या आंदोलनात त्यांचा ठळक असा सहभाग राहिला. या आठवड्यातल्या सर्व संघर्षमय घटनांमध्ये त्यांचा उल्लेखनीय असा सहभाग होता. सायंकाळनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. आज रात्री हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 64 होते.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.
गेल्या चार दशकांपासून आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणून विजय वाकोडे संपूर्ण मराठवाडाच नव्हे तर मराठवाड्याबाहेरही परिचित होते. पॅंथरच्या चळवळीतून धारदार असे नेतृत्व म्हणून ते पुढे आले. त्याकाळी सामाजिक विषमतेच्या सर्व आंदोलनांमध्ये ते सहभागी होते. दलित पॅंथरनंतर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे कार्य चालू ठेवले. लोकनेते या नावाने ते सार्वजनिक जीवनात परिचित होते तर प्रेमाने ‘बाबा’ हे संबोधन त्यांना मिळाले होते. आज सोमवारी परभणीतील पार पडलेल्या निदर्शने व आंदोलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. सायंकाळनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीतील एक शिलेदार हरवला आहे.
मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, गेल्या आठवड्यात आजारातून बरे झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात सक्रीय झाले होते. परभणीतील संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणानंतर पुकारलेल्या बंद आंदोलनाचे नेतृत्व त्यांनीच केले होते.
परभणीत 15 ऑगस्ट 2021 रोजी विजय वाकोडे यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला होता. आजी-माजी लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात त्यांच्यावरील लघुपटाचे प्रक्षेपण तसेच ‘अपराजित योद्धा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले होते. संविधानाच्या माध्यमातून पीडित, वंचितांना न्याय देण्याचा वसा विद्यार्थिदशेपासून उचलला असल्याचे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले होते. डॉ.भारत नांदुरे यांनी ’हर घर संविधान’ अभियान विजयराव वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यास सुरूवात करून एक लाख प्रती मोफत वितरित करण्याचा संकल्प केला होता. या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला.
