भगवंताच्या जीवात ज्याचा जीव रंगला तो धन्य – पूज्य राजन जी महाराज
पुणे : करोडोंच्या पैशापेक्षा आणि मोठ्या घरापेशा ज्याच्या ह्रदयात परमेश्वराचे घर साकारले जाईल, तो धन्य होईल. मानवी शरीर प्राप्त करून परमेश्वराच्या चरणात प्रेम करायला लागेल, तिथे माणसाच्या आयुष्यात धन्यता आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने भगवंताच्या जीवात ज्याचा जीव रंगला तो धन्य, असे पूज्य राजन जी महाराज यांनी सांगितले.
श्री गौड ब्राह्मण समाज, श्री चारभुजानाथ मंदिर राम कथा समितीतर्फे श्रीराम कथा प्रेम यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे आयोजित कथा सोहळ्यात तिसऱ्या दिवशी प्रेममूर्ती पूज्य संत श्री प्रेमभूषणजी महाराज यांचे कृपापात्र पूज्य राजन जी महाराज यांनी निरूपण केले.
पूज्य राजन जी महाराज म्हणाले, प्रभू श्रीरामाचा भक्त ज्या कुळात जन्म घेईल, ते संपूर्ण कुळ धन्य आहे. जेवढे धन प्राप्त होत असेल, त्यातील दहावा भाग हा परमार्थ कार्याकरिता खर्च करायला हवा. परमेश्वराला देखील वाटले पाहिजे, त्याने जे दिले आहे त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होत आहे.
ते पुढे म्हणाले, प्रेमाने जो परमेश्वराचे नामस्मरण करतो, त्याला मुक्ती मिळते. त्यामुळे बॅंकेतला बॅलन्स वाढविण्यापेक्षा नामस्मरणाचा बॅलन्स वाढवायला हवा. संपूर्ण ब्रह्मांड मध्ये विश्वास करण्यासारखा कोणी असेल तर एकच आहे, तो म्हणजे परमेश्वर. त्यामुळे जेव्हा जेव्हा जिथे जिथे वेळ मिळेल, तिथे तिथे नामस्मरण करीत रहायला हवे.
कथा सोहळ्याचे आयोजन दि. २२ डिसेंबर पर्यंत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ यावेळेत चित्रकूट धाम, वर्धमान लॉन्स समोर, बिबवेवाडी कोंढवा रस्ता येथे करण्यात आले आहे. श्रीराम कथा प्रेमयज्ञ सोहळ्यात श्री बाल लीला, श्री सीताराम विवाह महोत्सव, श्री केवट प्रेम, श्री राम मंगल यात्रा, श्री भरत चरित्र, श्री शबरी प्रेम, सुंदरकाण्ड आणि श्री राम राज्याभिषेक याविषयी पूज्य राजनजी महाराज हे निरूपण करीत आहेत. सोहळ्याकरिता प्रवेश विनामूल्य असून रामभक्तांनी मोठया संख्यने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
