Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

सोमनाथ सूर्यवंशी मृत्युप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी – सुनील माने

 

पुणे : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्युप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या मागणीचे पत्र त्यांनी ई- मेल द्वारे पाठवले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, परभणीतील डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर तेथे मोठ्या प्रमाणावर दंगल उसळली. याच्या निषेधार्थ अनेक लोक रस्त्यावर उतरले. याप्रकरणी ५० हून अधिक लोकांवर मुख्य आरोपी म्हणून तर ३०० ते ४०० जणांवर सह आरोपी म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांकडून अनेक तरुणांना आणि महिला कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचे त्याच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. मात्र पोलिसांनी त्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे म्हटले होते. याप्रकरणी दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. त्याचप्रमाणे परभणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी आकस बुद्धीने इथल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक घोरबांड यांनाही निलंबित करून त्यांची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी सुनील माने यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading