भाषेच्या भिंती ओलांडून माणूस आणि जग समजून घ्या :प्रवीण तरडे
प्रसिद्ध भारतीय कवी सुब्रमण्यम भारती यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 11 डिसेंबर 2024 रोजी भारतीय भाषा उत्सव साजरा करण्यात आला आणि त्याच वेळी पुणे पुस्तक महोत्सवाची “शांतता पुणेकर वाचत आहेत ” ह्या कार्यक्रमाने सुरुवात झाली. संत नामदेव सभागृहामध्ये हा संस्मरणीय सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक सुरेश गोसावी होते. सन्माननीय अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र कुलगुरू पराग काळकर आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक श्री राजेश पांडे हेही हजर होते. महोत्सव संकल्पना आणि उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करताना आपल्या भाषणात श्री. राजेश पांडे यांनी पुणे पुस्तक महोत्सवाचे स्वरूप आणि त्यानिमित्ताने घडून येणारे वेगवेगळे विश्वविक्रम याबाबत माहिती दिली आणि पुण्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून असलेली ओळख सर्वत्र अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा आपला मानस व्यक्त केला.
भारतीय भाषा उत्सव आणि पुणे पुस्तक महोत्सव शांतता पुणेकर वाचत आहेत ह्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक v चित्रपट निर्माते श्री प्रवीण तरडे यांचे विशेष व्याख्यान पार पडले. यामध्ये त्यांनी वाचनाचे आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करताना आपल्या संदर्भसंपृक्ततेची झलक दाखवली. संत तुकोबा, जनाबाई, समर्थ रामदास, जॉर्ज ऑरवेल, नामदेव ढसाळ,धर्मवीर भारती अशा अनेक संत व साहित्यिकांचे दाखले देऊन त्यांनी वाचन हा आयुष्यातील किती निर्णायक आणि महत्त्वपूर्ण भाग आहे, हे स्पष्ट करून सांगितले. भाषा, संस्कृती, प्रदेश, भूगोल, राजकीय मतभेद आणि वैचारिक तटभिंती ओलांडून आपण माणसांशी वागले पाहिजे आणि संस्कार वाचनातून होतो आणि ग्रंथ हेच खरे जगण्याचे सामर्थ्य आहे असे त्यांनी सांगितले.
प्रवीण तरडे स्वतःही एक चोखंदळ वाचक म्हणून ओळखले जातात. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक श्री राजेश पांडे यांनी आपल्या भाषणात प्रवीण तरडे यांच्या या गुणाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी या भाषा महोत्सवाचे महत्त्व आणि पुण्याची सांस्कृतिक ओळख पुनरुज्जीवित करणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची दखल घेत ही चळवळ किती व्यापक स्वरूपाची असून अनेकांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा देणारी आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत उपरोक्त उपक्रमाबद्दल मार्गदर्शन करून आपल्या शुभेच्छा दिल्या. भाषा व साहित्य प्रशाला संचालक प्राध्यापक प्रभाकर देसाई ह्यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
श्री. प्रवीण तरडे यांनी आपल्या मानधनाची रक्कम महोत्सवात सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना पुस्तके द्यावीत असे सांगून ती रक्कम समर्पित केली. या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य देवीदास वायदंडे, बागेश्री मंठाळकर, संगीता जगताप, वित्त व लेखाधिकारी चारूशीला गायके आणि विद्यापीठातील प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, अधिसभा सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते. प्रवीण तरडे ह्यांच्या व्याख्यानासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते. विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण webcast.unipune.ac.in वर करण्यात आले आणि तिन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयात ह्याचे live प्रसारण करण्यात आले आणि विद्यावाणी एफएम ह्या रेडिओवर सुद्धा थेट ध्वनीप्रसारण करण्यात आले. एकूण 45000 हून अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष व online जोडले गेले होते. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले.
