महाराष्ट्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात घालण्यासाठीच महायुतीने सत्ता स्थापन केली – खासदार संजय राऊत
मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र उद्योगपती गौतम अदानी यांच्या घशात घालण्यासाठीच भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या महायुतीने राज्यात अवैधपणे सत्ता स्थापन केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
देशभरात बंदर आणि विमानतळ अदानीच चालवत आहेत. अनेक मोठमोठे प्रकल्प त्यांच्याकडे आहेत. इतकेच काय केंद्रातील आणि आता राज्यातील सरकारही अदानीच चालवत आहेत. अशा या जगातील श्रीमंतांपैकी उद्योगपतीला टोलनाके, जकात नाके आणि भाजीची दुकानही चालवायला हवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र असलेल्या अदानी यांच्या घशात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र घालण्यासाठीच हे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळेच अदानी यांनी मंत्रिमंडळ स्थापन होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, असा आरोप राऊत यांनी केला.
भाजपामध्ये नैतिकता नावालाही शिल्लक नाही
विरोधी पक्षातील अनेक आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून सांगितले जात आहे. त्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, भाजपकडे यंत्रणा आहेत. पैसा आहे. त्यामुळे ते या मार्गाने फोडाफोडी करूच शकतात. यापूर्वी देखील त्यांनी तेच केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील भाजपने भीती दाखवूनच आपल्याकडे घेतले आहे. त्यांचे ऑपरेशन लोटस नव्हे तर ऑपरेशन डर आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली. अशाप्रकारे लोक आपल्याकडे एकदा आले की त्यांच्यावरील खटले काढून घ्यायचे, जप्त केलेली संपत्ती परत करायची, हे भाजपचे उद्योग आहेत. भाजपामध्ये नैतिकता नावाची बाब उरलेली नाही, अशी कठोर टीका राऊत यांनी केली.
… म्हणून कोलमडली राज्यातील कायदा सुव्यवस्था
विधानसभेचे निवडणूक निकाल लागून तब्बल वीस दिवस झाले तरी मंत्रिमंडळ नाही. खाते वाटप नाही. गृहमंत्री पद कोणाकडे हे निश्चित नाही. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, अशी टीका करतानाच राऊत यांनी बीडच्या केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख व पुण्याजवळ मांजरी येथे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचे उदाहरण दिले. भाजपच्याच काही आजी-माजी आमदारांची भाषा सराईक गुंडांपेक्षाही अधिक उर्मटपणाची आहे. या सगळ्याला फडणवीस यांची मान्यता असेल तर आम्ही त्याच्या विरोधात रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.
राज्यसभेचे अध्यक्ष सरकारचे पक्षपाती
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड हे सरकारचे पक्षपाती असल्याचा आरोप राऊत यांनी केला. सभागृहात विरोधकांचा आवाज दडपला जातो. विरोधी पक्ष नेत्याचा माइक बंद केला जातो. विरोधकांना असलेला जनतेचे विषय मांडण्याचा, सरकारवर टीका करण्याचा हक्क डावलला जातो. त्यामुळे अविश्वास ठराव आणण्याशिवाय आमच्याकडे मार्ग नाही, असेही राऊत म्हणाले.
