Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंच्या हत्या प्रकरणात भूमिका घेतली नाही – संजय राऊत

नवी दिल्ली:  बांगलादेशात अल्पसंख्य हिंदूंच्या हत्या होत असताना, त्यांच्यावर अत्याचार होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. हिंदुत्ववादी म्हणून घेणारा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही याबाबत भूमिका घेतली नसल्याचा आरोप करीत राऊत यांनी टीका केली. 

शेख हसीना यांची हकालपट्टी केल्यानंतर बांगलादेश कट्टरपंथी आणि  मूलतत्ववाद्यांच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी अल्पसंख्या हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणावर हल्ले, हत्या आणि अत्याचार होत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी, केंद्र सरकार, भाजप आणि संघ याबाबतीत ठोस भूमिका न घेता केवळ सचिव पातळीवर चर्चा सुरू आहेत, असा दावा राऊत यांनी केला. 

असाच प्रकार पाकिस्तानात घडला असता तर मोदी यांनी इंडिया गेटवर उभे राहून पाकिस्तानला घरात घुसून मारण्याची धमकी दिली असती. त्यावेळी केवळ सचिव पातळीवर चर्चा करून अशीच भूमिका घेतली असती का, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. 

बांगलादेशातील अल्पसंख्या हिंदूंवर होणारे हल्ले ही अत्यंत गंभीर बाब आहे. कट्टर पंथीयांकडून अल्पसंख्यांक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यांची घरे, संस्था, मंदिरे यांची जाळपोळ आणि नासधूस केली जात आहे. इस्कॉन सारख्या आंतरराष्ट्रीय धार्मिक संस्थेचे पुजारी चिन्मय दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांवरही हल्ले होत आहेत. या सगळ्यामुळे स्वतःला हिंदूंचे नेते म्हणविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्त विचलित होत नाही का, असा सवालही राऊत यांनी केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading