Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 14 तारखेला?

मुंबई:  नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता असतानाच 14 तारखेला राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्ताराचा मुहूर्त लागेल, अशी माहिती महायुतीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 

विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करूनही मुख्यमंत्री पदाची निश्चिती आणि एकनाथ शिंदे यांचा गृह मंत्रालयाचा आग्रह यामुळे मुख्यमंत्री पदाची निवड निकालानंतर तब्बल बारा दिवसानंतर करण्यात आली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 

भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यमहायुतीतील तिन्ही प्रमुख घटक पक्षांची संभाव्य मंत्र्यांची यादी केंद्रीय नेतृत्वाच्या संमतीसाठी दिल्ली येथे रवाना करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या संभाव्य मंत्र्यांच्या नावावर संसदीय समितीने हिरवा कपिल दाखवल्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या यादीचा आढावा गृहमंत्री अमित शहा यांच्यासह प्रमुख केंद्रीय नेते घेणार आहेत. 

शिवसेना शिंदे गटाने सादर केलेल्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत मागच्या मंत्रिमंडळातील बहुतेकांचा समावेश असून त्याशिवाय मागच्या वेळी मंत्री पदाच्या प्रतीक्षेत असलेले संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले अशा नावांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सात जणांची यादी देण्यात आली असून त्यात बहुतेक सर्वच जुन्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा समावेश आहे. 

मागील कार्यकाळात कार्यक्षमता न दाखवलेल्या व विविध प्रकारचे आरोप असलेल्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार नाही, असे केंद्रीय नेतृत्वाचे आदेश असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कामाचा आढावा घेऊन मंत्री पदाची जबाबदारी दिली जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, शिवसेनेच्या यादीत तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या यादीत हसन मुश्रीफ यांच्यासारख्या वादग्रस्त आणि आरोप असलेल्या मंत्र्यांच्या नावांचाही समावेश आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading