Monday, November 23, 2026
BusinessLatest News

जर्मनीसोबतच्या औद्योगिक भागीदारीसाठी महाराष्ट्र सर्वाधिक सक्षम – डॉ. अमोल शिंदे

पुणे  : भारत आणि जर्मनी यांच्यातील सात दशकांच्या विश्वासपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर पुढील औद्योगिक युगासाठी महाराष्ट्र हा जर्मनीचा सर्वाधिक सक्षम भागीदार ठरू शकतो, असा विश्वास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (गुंतवणूक प्रोत्साहन) डॉ. अमोल शिंदे यांनी व्यक्त केला.

पुण्यातील हयात येथे आयोजित इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (आयजीसीसी) वार्षिक प्रादेशिक बैठकीत ते बोलत होते. ‘महाराष्ट्र : पुढील औद्योगिक युगासाठी जर्मनीसोबत भागीदारी’ या विषयावर त्यांनी प्रमुख भाषण केले. यावेळी इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रादेशिक संचालक कल्पेश सराफ, महासंचालक जान नोथर तसेच जर्मन आणि भारतीय उद्योग क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत-जर्मनी संबंधांना ७० वर्षांची परंपरा असून अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्कृष्टता, परस्पर विश्वास, गुंतवणूक आणि कौशल्य विकास या आधारावर हे संबंध अधिक दृढ झाले आहेत. मात्र, बदलत्या जागतिक औद्योगिक परिस्थितीत आता केवळ उत्पादन क्षेत्रापुरते सहकार्य मर्यादित न ठेवता नावीन्यपूर्ण संशोधन, शाश्वत विकास आणि पुढील पिढीच्या उद्योगांसाठी व्यापक भागीदारी निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

एमआयडीसीने राज्यात ३०० हून अधिक औद्योगिक क्षेत्रे विकसित केली आहेत. ऑटोमोबाईल, धातू आणि रसायने यांसारख्या पारंपरिक उद्योगांसोबतच एरोस्पेस, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रिक वाहने आणि हरित ऊर्जा या उदयोन्मुख क्षेत्रांमध्येही महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे जर्मन कंपन्यांसाठी राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या ६६० अब्ज डॉलरची असून २०३० पर्यंत ती एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. देशाच्या एकूण परकीय थेट गुंतवणुकीत (एफडीआय) महाराष्ट्राचा वाटा ३१ टक्के, निर्यातीत १७ टक्के, तर जागतिक क्षमता केंद्रांमध्ये (जीसीसी) २४ टक्के आहे. याशिवाय राज्यात ५० हजारांहून अधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत. कुशल मनुष्यबळ, भांडवल, आधुनिक सेवा आणि विकसित औद्योगिक पायाभूत सुविधा यांमुळे जर्मन उद्योगांसाठी महाराष्ट्रात अनुकूल व्यावसायिक परिसंस्था उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भांडवल, प्रतिभावान मनुष्यबळ, सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षमता यांचा समन्वय ही महाराष्ट्राची प्रमुख ताकद आहे. या सर्व घटकांच्या बळावर भारत-जर्मनी औद्योगिक सहकार्याला नवी दिशा देण्याची क्षमता महाराष्ट्रात असून, आगामी औद्योगिक क्रांतीत दोन्ही देशांसाठी राज्य महत्त्वपूर्ण भागीदार ठरेल, असा विश्वास डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply