Parbhani : संविधान प्रतिकृतीची विटंबना; तणावानंतर जिल्ह्यात शांतता
- दगड मारणाऱ्या माथेफिरुला अटक, अनेक ठिकाणी रास्ता रोको, दगडफेक
परभणी : शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माथेफिरुने दगड मारून काच फोडला. ही घटना मंगळवार १० डिसेंबर रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परभणी शहरात तिव्र पडसाद उमटून तणावाची स्थिती निर्माण झाली. संतप्त आंबेडकरी अनुयायांनी रास्ता रोको करुन संबंधित माथेफिरुवर कारवाईची मागणी केली. काही काळ रास्ता रोको केला तसेच परभणी रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस समोर आंदोलन केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
रेल्वे स्टेशनसमोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा आहे. पुतळ्यासमोर काचेच्या बॉक्समध्ये संविधानाची प्रतिकृती आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास एका माथेफिरुने या प्रतिकृतीवर दगड मारला.
त्यामुळे विटंबना झाली. या घटनेची माहिती मिळताच आंबेडकरी अनुयायी पुतळा परिसरात जमा झाले. माथेफिरुवर कारवाई करण्याची मागणी करत आंदोलन सुरू करण्यात आले. पोलीस प्रशासनाला माहिती समजताच मोठ्या संख्येने पोलीस पुतळा परिसरात आले. यावेळी दगडफेकीची घटना देखील झाली. एक ट्रक आणि महामंडळाच्या
बसवर दगड फेकून काच फोडण्यात आले. रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्सप्रेस थांबवत आंदोलन सुरू करण्यात आले. विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विटंबना करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवार ११ डिसेंबर रोजी बंद पाळण्यात येत आहे. या घटनेमागे कोणते षडयंत्र आहे, याचा शोध घेण्याची मागणीसाठी हा बंद पुकारला आहे. दरम्यान घटनास्थळी मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी भेट देवून बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून परिसराची पाहणी केली. संविधानाची प्रतिकृती नव्याने बसविण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. सामाजिक सलोखा राखत हा बंद शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे. त्यामुळे कुणीही आक्रमक भूमिका न घेता बंद शांततेत पार पाळावा, असे आवाहन लोकनेते विजय वाकोडे यांनी केले आहे.
