शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद महत्त्वाची – सविता कुंभार
पुणे : कुठल्याही प्रकारची काम करण्यासाठी शारीरिक ताकदीपेक्षा मानसिकरित्या खंबीर असणं महत्वाचं असत मग त्यात तुम्ही पुरुष आहेत की महिला हा फरक नगण्य ठरतो, असं परखड मत रिक्षा चालक सविता कुंभार यांनी मांडले . महिला जागर समिती आयोजित ‘मेरी रातें, मेरी सड़कें’ उपक्रमाअंतर्गत चाकोरी तोडणाऱ्या महिलांचा सन्मानाचा या उपक्रमाच्या सातव्या रात्री कुंभार बोलत होत्या. शनिवार येरवड्यातील लक्ष्मीनगर येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चौकात ‘ मेरी राते , मेरी सडके ‘ हा महिला सन्मानाचा कार्यक्रम झाला.
अतिशय प्रतिकूल परिस्थिती असूनही जिद्दीच्या जोरावर पारंपरिक चौकटीला भेद देत महावितरणमध्ये वायरमन बनलेल्या अर्पणा काळे, चहाची टपरी चालवत मुलीला डॉक्टर बनवणाऱ्या जुलेखा युसुफ शेख, उजनी प्रकल्पग्रस्तांसाठी झटणाऱ्या दीपाली वगरे, योगा शिकविणाऱ्या मालन पवार, पुणे महानगर परिवहन मंडळातील कंडक्टर हेमलता भोये यांचा सन्मान करण्यात आले. यावेळी कोरेगाव पार्कच्या पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला व महिला जागर समितीचे संयोजक उपस्थित होते. यावेळी रुणाल मुल्ला म्हणाल्या, “समाजाला तोंड देत एखाद्या महिलेने नोकरी करत संसाराची जबाबदारी सांभाळत स्वाभिमानाने जगणं हे खूप आव्हानात्मक असत हे आव्हान सांभाळण्यासाठी व्यक्तीच मन खूप मजबूत लागते.”
विविध क्षेत्रात महिला हळूहळू पण हिमतीने आपलं स्थान बळकट करत आहेत अशा चाकोरी तोडणाऱ्या महिलांच्या अनुभवातून, त्यांच्या संघर्षाच्या कहाण्यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळावी या उपक्रमा मागील उद्देश असल्याचे ॲड असुंता पारधे यांनी सांगितले. सीवायडीए च्या युवा कार्यकर्त्यांनी विशेषतः मुलींनी ‘पहाडोसी बन रही है लडकीया‘ हे गाणं घेऊन उपस्थितांची दाद मिळवली .
यावेळी ओजस्वी बहुउद्देशीय संस्थेच्या प्रियंका रणपिसे, दिशा संस्थेच्या पौर्णिमा गादिया, भटक्या विमुक्तांमध्ये काम करणाऱ्या शारदा खोमणे, निर्भय विद्यार्थी अभियानाच्या सुलभा क्षिरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते अकबर खान, इमाम शेख, अन्वर पठाण , डॅनिअल लांडगे, अजित गंगावणे, जार्ज स्वामी, उद्योजक गणेश बाबर यांनी सहकार्य केले.
नीलिमा घरत यांनी सूत्रसंचालन केले तर दिलीप कुऱ्हाडे यांनी आभार मानले.
