Monday, June 15, 2026
BusinessLatest NewsPUNE

शिस्तबद्ध पद्धतीने केलेली गुंतवणूक उत्तम संपत्ती – सीए रचना रानडे


 पुणे  : “लाखो युट्यूब फॉलोअर्स असलेल्या प्रसिद्ध फायनान्स शिक्षिका सीए रचना रानडे यांनी सर्वसामान्यांना आर्थिक नियोजनाचे महत्व पटवून देण्याचा पुढाकार घेतला. अपस्टॉक्स प्रस्तुत ‘हर घर इन्व्हेस्टर’ हा कार्यक्रम आर्थिक नियोजनाचे मार्गदर्शन करण्यासाठी सीए रचना रानडे  (CA Rachna Ranade) यांनी आयोजित केला. “आर्थिक सक्षमीकरणाच्या ध्येयाने मी अपस्टॉक्स सोबत जोडले गेले, परंतु आमच्या सामायिक महत्वाच्या टप्प्यांनी आम्हाला प्रगतीचे भागीदार बनवले. अपस्टॉक्स माझ्या पहिल्या यूट्यूब कोलॅबोरेशन व्हिडिओपासून ते माझ्या पहिल्या लाइव्ह इव्हेंटपर्यंत बरोबर आहे,” असे रचना यांनी नमूद केले. तिकीट विक्री सुरू झाल्यावर काही वेळातच कार्यक्रम हाऊसफूल होऊन तब्बल ५०० प्रेक्षकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. एरंडवणे येथील शकुंतला शेट्टी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमासाठी तरुणांसोबतच आबालवृद्ध मंडळींनी देखील मोठ्या संख्येने गर्दी केली होती जेथे १४ वर्षांच्या किशोरांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी ह्या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट लोकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आणि शेअर बाजार व अर्थशास्त्र यांसारखे क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने शिकवणे हे होते. ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ४०% पुरुष आणि ५१% महिलांचे असे म्हणणे होते की “आम्हाला आर्थिक व्यवस्थापन या विषयाचे सखोल ज्ञान नसल्यामुळे आम्हाला गुंतवणूक करायचा आत्मविश्वास नाही.” त्यामुळे जे उद्दिष्ट घेऊन हा कार्यक्रम आखण्यात आला होता, ते उद्दिष्ट साध्य होत आहे असेही रचना रानडे यांनी व्यक्त केले.

गुंतवणुकीचा मागोवा घेणे आणि कुटुंबातील किमान एका सदस्याला आर्थिक तपशिलांची माहिती असणे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला, तसेच आर्थिक निर्णयांमध्ये महिलांचा सहभाग असावा असेही त्यांनी व्यक्त केले.

गुंतवणूकदारांबरोबर त्यांनी मिश्किल आणि ओघवत्या शैलीमध्ये संवाद साधताना पैशाचे व्यवस्थापन कसे करावे, हे काही विशिष्ट उदाहरणाच्या माध्यमातून पटवून दिले. आपल्याला मिळणाऱ्या उत्पनापैकी किती रकमेची बचत करावी, त्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत, विमा काढताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ही माहिती देखील त्यांनी यावेळी उपस्थित मंडळीना करून दिली.

जीएसटी, फोरेक्स रिझर्व, वित्तीय तूट, जीडीपी अशा अनेक अर्थशास्त्रीय संकल्पना प्रेक्षकांना सोप्या भाषेत शिकवून यासर्वांचा शेअर बाजारावर कसा परिणाम होतो हेही त्यांनी समजाविले. भारताची अर्थव्यवस्था सध्याच्या स्थितीत जगामध्ये पाचव्या स्थानावर आहे. येत्या दोन वर्षामध्ये भारत चौथ्या स्थानावर नक्की येऊ शकतो, त्यामुळे एकीकडे अर्थव्यस्था बळकट होत असताना दुसरीकडे आपण आर्थिक ज्ञान बळकट करून शेअर बाजारात / म्यूचुअल फंडात शिस्तबद्ध पद्धतीने दीर्घकालीन दृष्टिकोन ठेऊन गुंतवणूक करावी असे मत रचना रानडे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading