Tuesday, June 16, 2026
BusinessLatest NewsPUNE

नव्या संधींच्या उपलब्धतेने २०३० पर्यंत महसूल तिप्पट होण्याचा प्राज इंडस्ट्रीजला विश्वास

डॉ. प्रमोद चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे  : शाश्वत विमान वाहतूक इंधन (एसएएफ), बायोपॉलिमर आणि एनर्जी ट्रान्झिशन अँड क्लायमेट अॅक्शन (ईटीसीए) अर्थात ऊर्जा संक्रमण व हवामान कृती यांसोबतच इतर अनेक क्षेत्रांमध्ये जागतिक स्तरावर प्राज इंडस्ट्रीजला महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होत असून २०३० पर्यंत संस्थेचा महसूल तिप्पट होईल, असा विश्वास भारताचे इथॅनॉल मॅन अशी ओळख असलेले ज्येष्ठ उद्योजक व प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. प्राजच्या बायोएनर्जी बिझनेसचे अध्यक्ष अतुल मुळे आणि तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष घन:श्याम देशपांडे हे देखील पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ चौधरी म्हणाले, “ऊर्जा संक्रमण आणि हवामान कृती (ईटीसीए) याची आज जागतिक पातळीवर दखल घेतली जात असून प्रामुख्याने यामध्ये ब्लू व ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया यांची निर्मिती व वेस्ट टू एनर्जी सोल्यूशन्स सारख्या गोष्टींचा समावेश होतो. नजीकच्या भविष्यात या सर्व क्षेत्रांना मोठी चालना मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे. याबरोबरच २०३० पर्यंत हरित ऊर्जा अर्थात क्लीन एनर्जीमध्ये ऊर्जा क्षेत्रातील जगभरातील प्रमुख कंपन्या या सुमारे २५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पारंपरिक तेल आणि वायू क्षेत्रात पुढील १० वर्षांत २१ लाख कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक होईल, असा आमचा अंदाज आहे.

या पार्श्वभूमीवर वर नमूद क्षेत्रांमध्ये प्रकल्प उभारण्यासाठी ‘मॉड्युलरायझेशन सोल्यूशन्स’ची लक्षणीय मागणी निर्माण होईल असे आम्हाला वाटते. सदर मागणीची पूर्तता करण्यासाठी, प्राजने मॉड्युलरायझेशनमध्ये प्रभावी अभियांत्रिकी क्षमता विकसित केली असून यासाठी कर्नाटकातील मंगलोर येथे अत्याधुनिक उत्पादन सुविधा निर्माण केली आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प १२३ एकर परिसरात पसरला असून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केल्यास नजीकच्या भविष्यात वार्षिक दोन ते अडीच हजार कोटी रुपयांचा महसूल याद्वारे मिळविणे शक्य असल्याचे डॉ चौधरी म्हणाले.

दी कार्बन ऑफसेटिंग अँड रिडक्शन स्कीम फॉर इंटरनॅशनल एव्हिएशन (सीओआरएसआयए) या करारानुसार जागतिक पातळीवर युरोपियन युनियन आणि अमेरिकेने सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (एसएएफ – विमानाचे इंधन) मधील मिश्रणाचे लक्ष्य अनुक्रमे ६% व १०% ठेवले आहे. तर भारताने २०२७ पर्यंत १% आणि २०२८ पर्यंत २% मिश्रणाचे लक्ष्य ठेवले असल्याने सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल (एसएएफ) निर्मितीमध्ये प्राजसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडले आहेत. एअर एशिया, प्राज आणि इंडियन ऑईल यांच्या एकत्रित यशस्वी प्रयत्नांमुळे शुगर मोलॅसिसपासून तयार करण्यात आलेल्या, स्वदेशी बनावटीच्या एसएएफवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या व्यावसायिक प्रवासी विमानाने पुणे ते नवी दिल्ली प्रवासाचे काही महिन्यांपूर्वी यशस्वी उड्डाण देखील केले असल्याची माहिती घन:श्याम देशपांडे यांनी दिली.

यावेळी बोलताना अतुल मुळे म्हणाले, “प्राजचे सध्याचे उत्पन्न हे वार्षिक ३ हजार ४०० कोटी रुपयांच्या जवळपास असून २०३० पर्यंत हे १० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. सध्या यामध्ये निर्यातीचा वाटा हा सुमारे २९ टक्के असून येत्या काही वर्षांमध्ये तो ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा आमचा निर्धार आहे.”

मांदेडे गावाला नेट झिरो आणि हवामानास अनुकूल गाव बनविण्यासाठी प्राजच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या सामुदायिक प्रकल्पाच्या प्रगतीविषयी माहिती खालील प्रमाणे-

प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडने गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सहकार्याने पौडजवळील मांदेडे गावाला ‘नेट झिरो’ आणि ‘क्लायमेट रेझिलिएंट व्हिलेज’ बनविण्यासाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. याद्वारे पाणी, ऊर्जा, कचरा, उपजीविका आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा आमचा प्रयत्न असून या अंतर्गत प्रत्येक स्तरावर कार्यक्षमता वाढविणे, चांगले प्रशासन आणणे आणि प्रत्येक क्षेत्रात शाश्वतता वाढविणे यासाठी काम करण्यात येईल.

प्राजच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबद्दल अधिक माहिती देताना प्राज फौंडेशनचे विश्वस्त  अतुल मुळे म्हणाले, “सदर उपक्रम हा दीड वर्षापूर्वी सुरू झाला असून यानंतर गावात बरेच बदल झाले आहेत. त्यात ५० टक्के घरांमध्ये क्लीन कूक स्टोव्हज अर्थात प्रदूषणविरहीत स्वयंपाकासाठीच्या चुली बसविण्यात आल्या.  या चुलींच्या वापरामुळे इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या सरपणामध्ये तसेच धुराच्या उत्सर्जनामध्ये जवळजवळ ५० टक्के घट झाल्याचे आमच्या लक्षात आले आहे.”

ऊर्जा –
दुसरीकडे वीज वापरातून होणारे स्कोप २ उत्सर्जन कमी करण्याच्या पथदर्शी प्रकल्पाचा एक भाग म्हणून गावातील सुमारे १० टक्के घरांवर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रकल्पाला गती देत तो यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. या प्रकल्पांतर्गत सोलर पॅनल बसविण्यासाठी ग्रामस्थांमध्येही  मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असल्याची माहिती मुळे यांनी दिली.

पाणी –
जल व्यवस्थापन प्रकल्पाबाबत बोलायचे झाल्यास तीन साखळी बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत पाण्याची उपलब्धता असेल, याची काळजी घेण्यात आली आहे. याबरोबरच भूजल पुनर्भरण होण्यास देखील मदत झाली असून विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. सदर प्रकल्पाचे यश मोजण्यासाठी सविस्तर अभ्यास अद्याप सुरू आहे. शिवाय टेक्निकल हायड्रो जिओलॉजिकल अभ्यास देखील करण्यात आला असून जलस्त्रोतांचे मॅपिंग पूर्ण झाल्याने आता या हिवाळ्यात पाणलोट व्यवस्थापन उपक्रम सुरू होणार असल्याचे मुळे यांनी नमूद केले.

कचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्याचा पुनर्वापर –
कचरा प्रक्रिया विषयांत काम करीत असताना सध्या प्राधान्याने मुख्य वाडीमध्ये इको-एसटीपी ची उभारणी करण्यात आली असून याद्वारे नैसर्गिकरित्या ग्रे वॉटर झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामुळे वाडीतील संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया होणार असून, यासाठी कोणत्याही उर्जेची गरज भासणार नाही हे महत्त्वाचे. लवकरच गावातील इतर वाड्यांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येईल. घरगुती स्तरावरील सेंद्रिय कचऱ्यावर घरातच प्रक्रिया करणे सुरू करण्यात आले असून त्यासाठी कंपोस्टरसारख्या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मांदेडे गावाला नजीकच्या भविष्यात ‘नेट झिरो’ व ‘क्लायमेट रेझिलिएंट व्हिलेज’ म्हणून ओळख मिळवून देत असताना आणखीही अनेक उपक्रमांचे आयोजन प्राजच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading