Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

निसर्गाला गृहित धरू नका, निसर्ग माफ करणार नाही; साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत यांचे प्रतिपादन

पुणे : “मानव हा निसर्गाचा एक छोटा घटक आहे, हे माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. निसर्गावर कायमस्वरुपी नियंत्रणाचे प्रयत्न फोल ठरतात. विध्वंसाशिवाय दुसरे काही घडत नाही. त्यामुळे निसर्गाला गृहित धरू नका, निसर्ग माफ करणार नाही”, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत यांनी केले. ‘दकनी अदब फाऊंडेशन’ प्रस्तुत ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवशी ‘मराठी साहित्यसंवाद – त्रिधारा’, या कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रसिद्ध लेखिका मोनिका गजेंद्रगडकर आणि लेखक संग्राम गायकवाड हेही या संवादात सहभागी झाले होते. दत्ता घोलप यांनी त्यांच्याशी संवाद साधला. बालगंधर्व रंगमंदिर येथे संपन्न झालेल्या या दोन दिवसीय महोत्सावामध्ये महोत्सवाच्या समन्वयिका आयोजक मोनिका सिंग, आयोजक जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर यावेळी उपस्थित होते.

कृष्णात खोत यांनी निसर्ग आणि मानव, ग्रामीण जीवन आणि राजकारण, शिक्षणाची सार्वत्रिक परवड यावर परखड भाष्य करताना सांगितले, की आपले राज्यकर्ते आणि धोरणकर्ते आपल्या भूगोलाचा अजिबात अभ्यास न करता सरसकट धोरणे ठरवतात. भौतिक प्रगतीच्या नावाखाली निसर्ग ओरबाडतात. निसर्गचक्रात हस्तक्षेप करतात. निसर्ग आपला नोकर नाही आणि त्यावर आपले नियंत्रण नाही, हे विसरतात. त्यामुळे सर्वशक्तीमान निसर्ग वेळ येताच आपली शक्ती दाखवून देतो. आपल्या शिक्षणव्यवस्थेची इतकी पडझड झाली आहे, की ती स्वतःभोवती गिरक्या घेत आहे, ती कुठेच पोचत नाही. आपले ग्रामीण जीवन राजकारणाशी पराकोटीचे निगडीत झाल्याचे निरीक्षणही खोत यांनी नोंदवले.

मोनिका गजेंद्रगडकर म्हणाल्या, “सरधोपट स्त्रीवादी असण्यापेक्षा, स्त्रीमधील माणूसपण शोधणे मला लेखक म्हणून अधिक महत्त्वाचे वाटते. या माणूसपणाचे आंतरिक पीळ, वेदना, मनस्वीपण जाणून घेण्यात माझी लेखणी रमली. स्त्री म्हणून तिचे सोसणे आजही कायम आहे. तिच्यामधील मातृत्वाचा आदीबंध रेखाटण्याचा प्रयत्न मी करत आले. माझ्या लेखनातून मी स्त्रीमधील मातृत्वाचे सर्जन तिच्यातील सर्जनशील कलावंताला कसे मागे सारते, हे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. लेखनात जेव्हा अन्यधर्मिय तपशिलांची सूक्ष्मता अपरिहार्य ठरते, तेव्हा लेखकाचा अभ्यासही सर्जनशील पातळीवर पोचावा लागतो”, असे त्या म्हणाल्या.

वास्तवाला भारित करणारी आपली व्यवस्था, तरुणाईच्या नजरेने आणि भाषेत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे संग्राम गायकवाड यांनी सांगितले. “प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवेत असताना, जे अस्वस्थपण जाणवत होते, त्याच्या व्यक्तीकरणासाठी कादंबरीचा आकृतीबंध योग्य वाटला. धार्मिक ध्रुवीकरणाचे धागे राजकीय व सामाजिक संदर्भांशी कसे जोडले जातात, हे मांडण्यासाठी मी लोकधर्माची पृष्ठभूमी वापरली”, असेही ते म्हणाले.

या आधी ‘देवी. दिया अँड शी डेव्हील’ हा चर्चात्मक कार्यक्रम देखील संपन्न झाला. यामध्ये पत्रकार सलोनी मिस्त्री यांनी लेखिका किरण मनराल, तनुश्री पोद्दर आणि सुधा मेनन यांच्याशी संवाद साधला. यावेळी आपल्या लेखनाला कशी सुरुवात झाली, कोणते लेखनप्रकार आवडतात आणि एकूणच प्रकाशन संस्था यांबद्दल आलेले अनुभव या तिघींनी उपस्थितांसमोर सांगितले.

यावेळी बोलताना किरण मनराल म्हणाल्या, “आज प्रत्येक पुस्तकात स्त्रीचे मातृत्व खूप ‘ग्लोरिफाय’ केलेले दिसते. माझ्या पुस्तकांमध्ये मात्र आयुष्याच्या मातृत्त्वाच्या या टप्प्यात महिलांना होणारा, त्रास, त्रागा, मानसिक अस्वास्थ्य या सगळ्याच गोष्टींचा समावेश मी करीत आले असल्याने ते जिवंत वाटत असावे.”

प्रत्येक व्यक्तीचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा वेगळा असतो या विषयांवर पुस्तक लिहिताना संशोधन महत्त्वाचे ठरते, असे सांगत तनुश्री पोद्दर म्हणाल्या,”एखाद्याला पुस्तक लिहायचे असेल तर त्या आधी त्याने किमान १०० पुस्तके वाचायला हवी. केवळ प्रसिद्ध असलेली नाही तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके वाचा. पुस्तक लिहिताना कथानका बद्दलची सहानुभूती आणि उत्कटता ही तुमच्या आतून यायला हवी आहे.” स्वत:च्या पुस्तकाचे मार्केटिंग करायला शिका. आज एखादे पुस्तक चांगला आशय असेल म्हणून नाही तर चांगले मार्केटिंग केले, जाहिरात केली की खपते असेही त्यांनी सांगितले.

आपण लिहिलेले पुस्तक अनेकदा वाचा, त्यात व्याकरणाच्या चुका असता कामा नये असा सल्ला मेनन यांनी दिला. सामाजिक माध्यमे, अॅमेझॉन सारखी व्यासपीठे यांचा योग्य उपयोग केल्यास आपण आपल्या वाचकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचू असेही त्यांनी सांगितले.

पुस्तकांची दुकाने भविष्यातही राहतील यासाठी आजच्या पिढीने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे तीनही लेखिकांनी आवर्जून नमूद केले. यानंतर सायंकाळच्या सत्रात ‘दास्तानगोई’ या कार्यक्रमात उर्दू कथाकथन प्रकारात महाभारताची कथा फौजिया दास्तानगो यांनी उपस्थितांसमोर सादर केली. यावेळी रसिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिली. आर जे बंड्या यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading