Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

ज्येष्ठ नृत्यगुरू शमा भाटे यांना पद्मश्री सन्मान मिळावा; ज्येष्ठ कलासमीक्षक आशिष मोहन खोकर

पुणे  : “नृत्यनाट्य या कलामाध्यमातून एक व्यापक सामाजिक आशय किती प्रभावी पद्धतीने व्यक्त करता येतो, याचे उन्नयन नृत्यनाट्य हे अनोखे उदाहरण आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश सर्वाधिक प्रभावी पद्धतीने मांडणारे हे पॅन इंडिया नृत्यनाट्य आहे. या नृत्यनाट्याचे देशभरात अधिकाधिक प्रयोग व्हावेत आणि या नृत्यनाट्याच्या संकल्पक आणि नृत्यसंरचनाकार शमा भाटे यांना पद्मश्री सन्मान मिळावा”, असे गौरवोद्गार ज्येष्ठ कलासमीक्षक आशिष मोहन खोकर यांनी काढले.

निमित्त होते ज्येष्ठ कथक गुरु शमा भाटे यांची नाद-रूप संस्था व आर्ट हब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांच्या सहकार्याने आयोजित ‘उन्नयन’ या नृत्यनाटिकेच्या शुभारंभाच्या प्रयोगाचे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकमधील पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांचा जीवनप्रवास ‘उन्नयन’ या नृत्यनाट्यातून अनुभविण्याची संधी रसिकांना मिळाली.

विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील ओपन थिएटर येथे रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘उन्नयन’ चा प्रयोग रंगला. आर्ट हबच्या मुक्तीश्री, तसेच ज्येष्ठ कलासमीक्षक आशिष मोहन खोकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी कार्यक्रमाला लाभली होती.

पद्मश्री सालूमरदा थिमक्का यांनी पर्यावरण संरक्षणासाठी आपले आयुष्य वेचले आहे. या नृत्य नाटिकेत थिमक्का यांचा प्रेरणादायी प्रवास, त्यांचा संघर्ष, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा त्यांनी घेतलेला वसा, कालातीत असलेले त्यांचे कार्य यांचा आढावा परिणामकारक नृत्य, अतिशय प्रभावी संगीत आणि भावनाप्रधान प्रस्तुतीमधून सादर झाला. सुरवातीपासून अखेरपर्यंत या नृत्यनाट्याने थिमक्का यांचा वृक्षसंवर्धनाचा ध्यास मध्यवर्ती संकल्पनेप्रमाणे कायम ठेवला. दाक्षिणात्य अभिजात संगीतातील नाटै, मोहनम्, कल्याणी, केदारम्, हमीरकल्याणी आदी रागांतून आणि नाटीपाट, उत्सवसंगीतम, पुल्लूवनपाट असे लोकसंगीताचे विविध प्रकार संगीतकार विनय रामदासन यांनी कल्पकतेने योजून हे नृत्यनाट्य अर्थपूर्ण केले. चेंडा, एडंता, नादस्वरम्, तविल, एडुक्का, घटम्, खंजिरा, मंजिरा, ढोल तसेच वीणा, बासरी आणि सतारीचे सूरही नृत्यनाट्याचा आशय गडद करणारे ठरले.

सदर कार्यक्रमाची संकल्पना कथक गुरु शमा भाटे यांची होती. यामध्ये अमीरा पाटणकर, अवनी गद्रे, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी, ईशा नानल, प्रमोद वाघ, प्रचीती भावे, समृद्धी चव्हाण, नयन कोहळे, शलाका कांगो, मृण्मयी कुलकर्णी, चिन्मयी केळकर, रिया फडके, हिमानी पिले, तृप्ती, सानिका गोडसे आणि साक्षी गायकवाड या कलाकार सहभागी झाले होते. विनय रामदासन (संगीत), ईशान देवस्थळी आणि टीएसएम स्टुडीओ (मिक्सिंग व मास्टरिंग), शीतल ओक (वेशभूषा), हर्षवर्धन पाठक व ऋत्विज केळुस्कर (प्रकाशयोजना), प्रशांत उरुणकर (साउंड) यांचे विशेष सहकार्य यासाठी मिळाले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading