Monday, June 8, 2026
Latest NewsPUNE

आयुष्य खऱ्या अर्थाने अभिनय करायला शिकवते; सुप्रसिद्ध अभिनेते पंकज झा

पुणे  : तुमचे आयुष्य, आयुष्यातील अनुभव हेच तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी कलाकार बनवतात, त्यामुळे खरा अभिनेता हा अभिनय शिकून नव्हे तर आयुष्यभर त्याला येणाऱ्या अनुभवामधून, मिळणाऱ्या शिकवणीमधून घडत जातो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, कवी पंकज झा यांनी केले. व्यासपिठापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही ‘कलाकारी’ शिकता मात्र व्यासपीठावर आल्यानंतर मिळालेले यश पचविणाराच ‘खरा कलाकार’ असतो, असेही झा म्हणाले.

पुण्यातील दकनी अदब फाऊंडेशन आयोजित पाचव्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी ‘तुम्हारा मिलना जरुरी था तुम्हारे लिए’ या कॉफी टेबल टॉक कार्यक्रमात अभिनेत्री धनश्री हेबळीकर यांनी झा यांच्याशी संवाद सांधला त्यावेळी ते बोलत होते. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलच्या आयोजिका मोनिका सिंग, जयराम कुलकर्णी, मनोज ठाकूर, रवींद्र तोमर, युवराज शाह, शाहीर सुरेश वैराळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला.

लहान असताना मला औपचारिक शिक्षणामध्ये फारसा रस नव्हता. शाळेत मी विचित्र चेहरे बनवत गुरुजींकडून ५-५ मिनिटांचा ‘ब्रेक’ मागायचो. तेही माझ्या चेहऱ्याकडे पाहून तो द्यायचे. तेव्हापासून कदाचित अभिनयाचे वेड मला होते, असे सांगत पंकज झा यांनी आपला प्रवास उपस्थितांसमोर मांडला.

ते पुढे म्हणाले, “माझा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा कायमच इतरांपेक्षा वेगळा आहे, म्हणून मी ‘मिसफिट’ असल्याचे मला लहान असल्यापासून कायमच जाणवायचे. पुढे नुक्कड नाटक केले, अभिनय क्षेत्र वेगळे आहे म्हणून एनएसडीमध्ये प्रवेश घेतला, तो प्रवास आजवर सुरु आहे.”

आयुष्य असे जगा की तुम्ही जणू अभिनय करताय आणि अभिनय असा करा की जणू सत्यात आयुष्य जगत आहात, असे ओशो यांनी एकदा त्यांच्या शिष्याला सांगितले असल्याचे वाचले आणि हे मला पटले. तेव्हा पासून मी ओशो यांची शिकवण जपतो आहे. ‘पंचायत’ या वेबसिरीजसोबतच मी केलेली अनेक कामे यामुळेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असावी.

अनेक जण आपल्याशी विनाकारण गोड गोड बोलायला येतात, पण मला माझ्या भोवती अशी गर्दी नको असते म्हणून मी एकटाच खूष असतो. आज सगळे जग अभिनय करत असताना, प्रत्यके घरात अभिनयाचे अंक पार पडत असताना फक्त कलाकारच बदनाम आहेत अशा मिश्कील शब्दांत झा यांनी कलाकारांची पाठराखण केली. आज प्रत्येक घराघरात जेवढा अभिनय होत असतो तेवढा कुठेही होत नाही असेही त्यांने सांगितले.

तुम्ही चांगले कवी आहात, असे धनश्री हेबळीकर म्हणाल्या असता, आपण जेव्हा जवळून आयुष्य पाहतो तेव्हा आपसूकच कविता सापडते. आज घराघरात अनेक दुःखी लोक आहेत. घराघरांमध्ये फक्त मोठ्या प्रमाणात सामान आहे मोठमोठ्या गाड्या आणि गाद्या आहेत. आज सगळ्यांकडे गरजेपेक्षा जास्त पैसा आहे. मात्र जेवढ्या मोठ्या गाद्या तेवढी लोकांची झोप मात्र कमी झाली आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे आहे, असे पंकज झा यांनी सांगितले. रविंद्र तोमर यांनी पंकज झा यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading