टिपू सुलतान हे विरोधाभासी व्यक्तिमत्त्व – प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक विक्रम संपत यांचे प्रतिपादन
पुणे : “धर्माच्या नावावर हजारो हिंदू आणि ख्रिस्ती धर्मियांची कत्तल करणारा टिपू सुलतान शृंगेरी मठाच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक साह्य करून शंकराचार्यांना आपल्या दीर्घ आयुरारोग्यासाठी शतचंडी यज्ञ करण्यास सांगतो. ज्योतिषशास्त्राचा स्वतः अभ्यास करून वेगवेगळ्या धर्मातील ज्योतिषांचे मार्गदर्शन देखील घेतो, तेव्हा टिपू सुलतान हे विरोधाभासी व्यक्तिमत्त्व होते, याची जाणीव होते, असे मत प्रसिद्ध लेखक व इतिहासाचे अभ्यासक विक्रम संपत यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले.
‘पुणे संवाद’तर्फे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे (आयसर) या शैक्षणिक संकुलातील सी. व्ही. रामन सभागृहात आयोजित ‘द लाईफ अँड टाईम्स ऑफ टिपू सुलतान’ या कार्यक्रमात अमित परांजपे यांनी संपत यांची मुलखात घेतली. यावेळी संपत यांच्या टिपू सुलतान वर लिहिलेल्या ‘द सागा ऑफ मैसूर्स इंटरेग्नम्’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. देशाचे माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले व पुणे संवादचे आयोजक मनोज पोचट यावेळी उपस्थित होते.
“टिपू सुलतान अत्यंत क्रूर होता. त्याने धर्मांतर न करणार्या गैरइस्लामी लोकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या केल्या. विविध इस्लामी आक्रमकांनी अशा हत्या मोठ्या प्रमाणात केल्या. परंतु, आजचे मुस्लीम यातील कोणत्याही गैरकृत्याला जबाबदार नाहीत. त्यामुळे, कोण्या एका समाजाच्या भावना दुखावल्या जातात या तत्त्वाखाली आपण किती दिवस कोणी केलेली पापे धुवून टाकून त्यांची जयंती साजरी करणार आहोत? त्यांची ही काळी बाजू जगासमोर आणायचीच नाही का?” असे सवाल संपत यांनी या वेळी उपस्थित केला.
“१५ वर्षांपूर्वी टिपू सुलतानवर वृत्तपत्रात लिहिलेल्या एका लेखानंतर माझी मालमत्ता जाळण्यात आली. माझ्या आईवडिलांना धमकीचे पत्र देखील देण्यात आले. त्यानंतर आता ‘तू टिपू सुलतानबद्दल जाहीररीत्या काही बोलायचे नाही’, अशी शपथ मला माझा आईने घातली होती. काही वर्षांपूर्वी माझी आई देवाघरी गेली आणि त्यामुळे मी या शपथेतून मुक्त झालो. मी माझे टिपू सुलतान वरील पुस्तकाचे काम पूर्ण करण्याचे ठरवले”, अशी माहिती संपत यांनी दिली. ‘कदाचित १५ वर्षे या गोष्टीसाठी वाट पहावी लागली म्हणून पुस्तक जरा मोठे जवळ – जवळ ९०० पानांचे झाले’, अशी मिश्कील टिप्पणीही संपत यांनी यावेळी केली.
मराठे व म्हैसूर साम्राज्यातील संबंध, टिपू सुलतानचा शेवट, त्याचे वडील हैदर अली व त्यांच्या क्रूरतेचे किस्से, हैदर अली व टिपूने युद्धात केलेल्या रॉकेटचा वापर अशा विविध मुद्यांवर अमित परांजपे यांनी विक्रम संपत यांना बोलते केले.
यावेळी बोलताना विजय गोखले म्हणाले, “इतिहास हा विज्ञानाप्रमाणे विविध साधनांचा अभ्यास करूनच निष्कर्ष मांडत असतो. पुरातत्व, नाणकशास्त्र, प्राचीन भाषा व हस्तलिखिते, वास्तू, पत्रव्यवहार..असे अनेक पुरावे असतात. इतिहास हा काही फक्त राजे व त्यांची राजघराणी, त्यांच्या लढाया इथवर सीमित नसून तो आपल्याला त्या काळातील सामाजिक जडणघडण, संस्कृती, नैतिक मूल्ये व सामाजिक रचना समजून घेण्यात मदत करतो. सध्याच्या परिस्थितीत इतर देश आपल्यावर त्यांची मूल्ये लादू पाहत आहेत. त्यामुळे आजच्या काळात इतिहासाच्या अभ्यासाचे महत्व अधिक आहे, असे म्हणल्यास हरकत नाही, ही बाब त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केली. “आपल्याला आपलाच इतिहास व संस्कृती माहित नसेल इतरांनी आपल्या संस्कृतीचे, इतिहासाचे केलेलं चुकीचे आकलन आपल्याला खोडून काढता येणार नाही”, असेही ते म्हणाले.
पुणे संवादचे समन्वयक मनोज पोचट यांनी स्वागतपर प्रास्ताविक केले. दुर्गेश यांनी परिचय करून दिला व सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी – ‘पुणे संवाद’तर्फे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे (आयसर) या शैक्षणिक संकुलात असलेल्या सी. व्ही. रामन सभागृहात आयोजित ‘द लाईफ अँड टाईम्स ऑफ टिपू सुलतान’ या कार्यक्रमात विक्रम संपत यांच्या टिपू सुलतान वर लिहिलेल्या ‘द सागा ऑफ मैसूर्स इंटरेग्नम्’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी फोटोत डावीकडून मनोज पोचट, विजय गोखले, विक्रम संपत व अमित परांजपे.
