एसपीपीयुच्या डॉ. सोनिया नगराळे यांना प्रतिष्ठेचा पीआरसीआय सी.जे. जयंत स्मृती पुरस्कार प्रदान
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) विधी विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका आणि विद्यापीठाच्या वरिष्ठ कायदा अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) डॉ सोनिया नगराळे यांना नुकतेच पब्लिक रिलेशन्स काऊन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय)च्या वतीने पीआरसीआय सी. जे. जयंत स्मृती पुरस्कार २०२४ ने सन्मानित करण्यात आले. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पीआरसीआयच्या वतीने मंगळूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्ह दरम्यान ऊर्जा मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सदर पुरस्कार डॉ नगराळे यांना प्रदान करण्यात आला. मिस ग्लोबल इंडिया स्वीजल फुर्ताडो आणि पीआरसीआय राष्ट्रीय अध्यक्षा गीता शंकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉ. नगराळे या २०११ पासून पीआरसीआयशी संबंधित असून सध्या पीआरसीआय पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत..
पब्लिक रिलेशन्स काऊन्सिल ऑफ इंडिया ही संस्था राष्ट्रीय पातळीवरील कम्युनिकेशन प्रोफेशनल्सची संस्था आहे. संस्थेचे देशभरात जवळपास ५९ चॅप्टर्स असून यामध्ये तब्बल ८ आंतरराष्ट्रीय चॅप्टर्सचा देखील समावेश आहे हे विशेष. कम्युनिकेशन, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या भरीव योगदानाचे कौतुक करण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी देशभरातील विविध शहरांमध्ये ग्लोबल कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात येत असते. कर्नाटक येथील मंगळूरू येथे यावर्षी ही परिषद संपन्न झाली.
डॉ. सोनिया बी. नगराळे यांना संवैधानिक कायदा, मानवाधिकार, मीडिया कायदा, प्रशासकीय कायदा, गुन्हेगारी आणि दंडविज्ञान, वैद्यकीय न्यायशास्त्र आणि न्यायवैद्यक विज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये २० वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक अनुभव आहे. याबरोबरच त्यांनी सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशनसाठी ‘मीडिया लॉज् अँड एथिक्स’ यासोबतच ‘बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट – मेडिको-लीगल कॉन्टूर्स’, ‘लेजिस्लेटिव्ह प्रिव्हिलेजेस इन इंडिया लॉ, प्रोसिजर अँड प्रीसेडन्स’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. शिवाय ‘रेफरन्स पॉइंट्स फॉर दी डिझाईन अँड डिग्री प्रोग्राम्स इन लॉ’ आणि ‘अ सोशिओ लीगल अॅनालिसीस ऑफ फिमेल जेनिटल म्युटीलेशन/ कटिंग – अॅन ओव्हरव्हूव’ यांसाठी सह लेखिका म्हणूनही लिखाण केले आहे.
