मृतदेहांचा सन्मान करणाऱ्या देवदूतांविषयी कृतज्ञता
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयाअंतर्गत असलेल्या शवागारातील सेवक, तंत्रज्ञ आणि डॉक्टरांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा दिवाळीनिमित्त सन्मान करण्यात आला. शवागारातील कर्मचाऱ्यांचे कार्य हे देवदूतांसमान असल्याची भावना उपस्थितांनी या प्रसंगी व्यक्त केली.
दिवाळीचे निमित्त साधून श्री शनी मारुती बालगणेश मंडळातर्फे कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आज (दि. 31) ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागात आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ. धनंजय देशपांडे, भोई फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई, न्यायवैद्यक विभागाचे अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, डॉ. हरीश टाटिया, शंकर मुगावे, शनी मारुती श्री बालगणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष दीपक निकम, धारपवार घराण्याचे अध्यक्ष सागर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी तसेच मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती सचिन पवार यांनी प्रास्ताविकास सांगितली.
न्यायवैद्यक विभाग तसेच शवागारातील कामकाज कसे चालते याविषयी माहिती देऊन डॉ. हरीश टाटिया म्हणाले की, आमच्या कार्याला शवचिकित्सा असे संबोधले जाते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला आहे हे समजण्यासाठी शवाची चिकित्सा केली जाते. अनोळखी व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आमच्या विभागाचे कार्य मोलाचे ठरते. शवागारातील कर्मचारी मृतदेहाला अभिवादन करून कार्याला सुरुवात करतात. येथील कर्मचाऱ्यांना समाजाच्या मदतीची आवश्यकता आहे.
डॉ. धनंजय देशपांडे म्हणाले, शवागारातील कर्मचारी खऱ्या अर्थाने देवदूतच आहेत. त्यांच्या कार्याला दुसरी उपमाच देता येत नाही. डॉ. मिलिंद भोई म्हणाले, शवागारातील कर्मचाऱ्यांचे कार्य म्हणजे मृतदेहाशी संवादच आहे, असे म्हणावे लागेल. दिवाळीचे निमित्त साधून श्री शनी मारुती मंडळाने आयोजित केलेला हा उपक्रम माणसातील देवांची पूजा करण्यासाखाच आहे. शवागारातील ज्येष्ठ कर्मचारी रामदास सोळंकी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पियूष शहा यांनी केले. मंडळाचे दिनेश पेंढार, राहुल मारणे, संजय घाणेकर, गणेश शेलार, राज पेढारे उपस्थित होते.
